मुंबई - राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात यणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. (Free treatment for mucomycosis patients through Mahatma Phule Janarogya Yojana)जालना येथे माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले, ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले. या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरी परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगतानाच या आजाराचे लवकर निदान होणे गरजेच असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जाणीवजागृती करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.या आजावरील औषध महागडे असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या १००० रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असेही श्री. टोपे यांनी सांगितले. म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शन दखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असू त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रीत ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
Coronavirus :म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनारोग्य योजनेतून मोफत उपचार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 7:55 PM