मुंबई – राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालक यांना कामबंद करावं लागलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही खासगी वाहतुकीला सरकारकडून परवानगी नाही त्यामुळे अनेकांच्या पोटावर पाय आला आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून या कामगारांना बेरोजगार भत्ता द्यावा अशी मागणी केली आहे.
या पत्रात पृथ्वीराज चव्हाणांनी लिहिलं आहे की, कोरोनाच्या साथीमुळे महाराष्ट्रातील हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. तसेच परराज्यातील आणि परजिल्ह्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या १० लाख ६० हजार परवानाधारक रिक्षाचालकांवर आणि २ लाख ७५ हजार परवानाधारक टॅक्सी चालकांवरसुद्धा लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. दिल्ली राज्य सरकारने या घटकांना दर महिन्याला ५ हजार देण्याचे जाहीर केलं आहे. आपल्या सरकारनेदेखील बांधकाम मजुरांना महिना २ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले.
त्यामुळे जागतिक बँकेची २०१५ ची आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेची व्याख्या ही प्रतिदीन १४४ रुपये इतकी आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारकडून असंघटित आणि हातावर पोट भरणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महिना किमान ५ हजार बेरोजगारी भत्ता देण्यात यावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
याबाबत रिक्षा चालकांनी म्हटलं आहे की, दररोज शहरामध्ये जेमतेम ३०० ते ४०० रुपये कमाई होते. त्यामध्ये इंधनवाढ, शासनाचे विविध कर, इन्सुरन्स, बँक लोन, मुलांचे शिक्षण, कुटुंबातील आजारपण आणि वाढती महागाई याचा फटकाही आम्हाला बसतो. या अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावे लागते. शहराच्या बाबतीत रिक्षा चालक-मालक हा नेहमीच सामाजिक भान ठेवून वागत आहे. वेळेप्रसंगी प्रसंगावधान राखून अनेक वेळा समस्येत, अपघातात निस्वार्थी मदत केली आहे. अशा संघर्षकाळात आमची रोजची कमाई बंद झाल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा चालकांच्या समस्येसाठी कोणतेही कल्याणकारी मंडळ नाही. या लॉकडाऊनमुळे अनेक रिक्षा चालक मालक आर्थिक अडचणीत सापडला आहे. मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि कुटुंब उदरनिर्वाहाचा मोठा बिकट प्रश्न झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने आम्हाला मदत करावी अशी मागणी कराड तालुका चालक मालक रिक्षा कृती समितीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती.
अन्य बातम्या
राज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना ‘या’ निर्णयाचा फटका; एप्रिलचा पगार लांबणीवर पडणार?
जाणून घ्या, भारतात कोरोनाचा संसर्ग कधी संपुष्टात येणार?; सिंगापूर युनिव्हर्सिटीचा मोठा दावा!
माणुसकी हाच खरा धर्म! हज यात्रेसाठी जमा केलेल्या पैशातून ‘त्याने’ मजुरांना अन्नधान्य वाटले
...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा”