मुंबई – देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर पोहचला आहे. २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता लॉकडाऊन काही भागात वाढवलं जाऊ शकतं असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
मात्र अद्याप याबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. अशातच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचे ३ रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे. धारावीत कोरोनाचं संक्रमण वाढलं तर कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू शकते. त्यानंतर हे रोखणं सरकारसमोर आव्हान असणार आहे. त्याचसोबत मुंबईत सीआयएसएफच्या ६ जवानांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे ४३ नवीन रुग्ण आढळून आले. मागील २४ तासांत ६ रुग्णांचा जीव गेला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २६ इतकी झाली आहे. त्याचसोबत उपचारानंतर डॉक्टरांनी ५० रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. मुंबईची लोकसंख्या अधिक आहे. महापालिकेने शहरातील काही भाग कोरोना प्रभावित जाहीर केले आहेत. या परिसरातून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.
मालाड, वरळी, घाटकोपर, भायखळा, शिवाजीनगर(गोवंडी) या पाच भागात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. बीएमसीने कोरोना व्हायरसमुळे एम वेस्ट वॉर्ड, चेंबूर, देवनार याठिकाणी परिसरात सील केला आहे. तर एन विभागातील २० परिसर, एच पश्चिम येथील वांद्रे ते सांताक्रुझदरम्यान ११ परिसर, डी विभागातील मलबार हिलजवळील ११ परिसर सील करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ वरळी येथे कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, मुंबईत अनेक भाग मोठ्या प्रमाणावर बंद करण्यात आले आहेत. ते भाग दाट लोकसंख्येचे आहेत. अशा ठिकाणी कोरोनाची तपासणी करण्यासाठीचे सॅम्पल घेणे, त्याचा अहवाल येणे यात वेळ जाऊ शकतो त्यामुळे या साथीवर नियंत्रण आणणे कठीण होईल म्हणून ही रॅपीड टेस्ट करावी, असा आग्रह राज्य सरकारने धरला होता. आम्ही या तपासण्या खाजगी लॅबच्या माध्यमातूनही करुन घेऊ शकतो, असे टोपे यांनी सांगितले आहे.