लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : धार्मिक शिक्षणासाठी गेलेला तेवीस वर्षीय युवक हरिद्वार येथून मुंबईला आला. मुंबईहून तो बुधवार, दि. ६ रोजी ट्रकने सातारा येथे आला. जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी गेला असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे महाबळेश्वर येथे खळबळ माजली आहे.
संबंधित युवकावर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या जवळच्या नातेवाइकांना क्वॉरंटाईन केले आहे. त्या युवकाचा पत्ता महाबळेश्वर असला तरी त्या युवकाचा महाबळेश्वरशी काहीही संबंध नसून महाबळेश्वर कोरोनामुक्त असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
कोरोनाचे संकट घोंगावत असतानाच महाबळेश्वर पर्यटकांसाठी मार्चमध्येच बंद केले होते. त्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर झाला. या काळात येथील महसूल, पालिकेचा आरोग्य विभाग व पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे महाबळेश्वर तालुका कोरोनामुक्त राहिला होता. परंतु शनिवारी अचानक जिल्हा रुग्णालयात महाबळेश्वर येथील युवकाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे समजताच महाबळेश्वर येथे खळबळ निर्माण झाली. रात्री उशिरा या बातमीने प्रशासनाचेही धाबे दणाणले. या माहितीची खात्री करण्यासाठी रात्री उशिरा पालिका कार्यालयात प्रशासनातील सर्व अधिकारी हे एकत्र आले होते. यामध्ये तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी व ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राजीव शहा उपस्थित होते.
खात्री पटल्यानंतर खबरदारीच्या उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने तातडीने त्या युवकाचे येथील नातेवाइकांकडे चौकशी केली असता तो युवक अनेक महिने महाबळेश्वरपासून दूर होता. हे स्पष्ट झाल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला.याबाबत मिळालेली माहिती अशी, मनिपूर राज्यातील मौलाना २२ वर्षांपूर्वी कुटुंबासह रोजगारासाठी सातारा येथे आला होता. तेथे एक-दोन वर्षे व्यवसाय करायचा. सातारा येथून तो महाबळेश्वरला आला. मौलानाला चार मुले व एक मुलगी आहे. मुलीबरोबर पत्नी सातारा येथे राहते. तर दोन मुले आणि सून यांच्याबरोबर तो मौलाना महाबळेश्वरमध्ये राहत आहे. एक मुलगा अपंग आहे. सर्वात लहान मुलाला मौलानाने हरिद्वार येथे धार्मिक शिक्षणासाठी ठेवले होते. हरिद्वार येथून तो मार्चमध्ये मुंबईला आला होता. तेथे तो लॉकडाऊनमुळे अनेक दिवस अडकून होता. सातारा येथे असलेल्या आईला भेटण्यासाठी मुंबईचा लॉकडाऊन तोडून तो ट्रकने बुधवारी सातारा येथे पोहोचला.
घरी जाण्यापूर्वी त्याच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तो रुग्णालयात गेला त्याच्या तपासणीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला भरती करून घेण्यात आले. त्याचा तपासणीचा अहवाल आला असता तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. खबरदारीसाठी सातारा प्रशासनाने ही माहिती महाबळेश्वर येथे पाठविली. मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी तातडीने सर्व कर्मचाºयांना पालिकेत येण्याचे आदेश काढले. रात्री उशिरा पालिकेत कर्मचाºयांची गर्दी झाली.तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी व आरोग्य विभागाचे डॉ राजीव शहा पथकासह तेथे आले. त्या युवकाचे महाबळेश्वर येथे कोण-कोण नातेवाईक आहेत, याची माहिती घेतली. पालिका प्रशासनाने सर्व नातेवाइकांकडे चौकशी केली असता तो युवक महाबळेश्वर येथे आलाच नाही, अशी माहिती मिळाली. तरीही युवकाच्या नातेवाइकांना कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे.संबंधित युवकाचा महाबळेश्वरशी संबंध नाहीसंबंधित युवकाचा पत्ता केवळ महाबळेश्वरचा असून, तसा त्या युवकाचा व महाबळेश्वरचा काहीही संबंध नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. शहरात येणाºयांना वैद्यकीय तपासणीशिवाय गावात घेऊ नये,’ असे आवाहन माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी केले आहे. यावेळी माजी नगरसेवक संतोष शिंदे व अतुल सलागरे हे उपस्थित होतेनियोजन बैठकीला नगरसेविकेचा पती; पत्रकारांना मज्जावकारोना रुग्णाबाबतीत पालिकेतील प्रशासकीय अधिकाºयांच्या बैठकीला पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. परंतु त्याच बैठकीला नगरसेविकेच्या पतीला प्रवेश देण्यात आल्याने पत्रकार व नगरसेवक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तहसीलदार सुषमा चौधरी -पाटील यांनी वेळीच परिस्थिती हाताळल्याने संतप्त झालेले पत्रकार शांत झाले.