मुंबई : कोरोनाचा धोका संपला नसला तरी अलीकडची आकडेवारी काहीशी दिलासादायक आहे. रविवारी १० हजार ४६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर शनिवारी तब्बल २६ हजार इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले होते. त्यामुळे राज्यात एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२ लाख ६६ हजार २४० इतकी झाली. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ८२.८६ टक्के आहे.
मागील चार आठवड्यातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केल्यास, दर आठवड्याला नव्याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या काही अंशी कमी होत आहे. सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात १ लाख ५३ हजार ३३१ नवे रुग्ण आढळले होते. तर आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ९२,२४६ इतकी रूग्णसंख्या आहे. रुग्णांच्या संख्येत ४० टक्के घट झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला.
रविवारी कोरोनाच्या १०,७९२ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने बाधितांची संख्या १५ लाख २८ हजार २२६ झाली. तर एकूण १२ लाख ६६ हजार २४० रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या २ लाख २१ हजार १७४ सक्रिय रुग्ण असून रविवारी ३०९ मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४० हजार ३४९ झाला. सध्या राज्यातील मृत्युदर २.६४ टक्के आहे.मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवरमुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात येत असला, तरी ठरावीक परिसरात रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. शहर-उपनगरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहोचले असून, आतापर्यंत १ लाख ९३ हजार ८०५ रुग्ण कोविडमुक्त झाले, तर रुग्ण दुपटीचा काळ ६९ दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत रविवारी कोरोनाचे २ हजार १७० रुग्ण आढळले असून, ४२ मृत्युंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या २ लाख २९ हजार ४४६ वर पोहोचली आहे, तर बळींचा आकडा ९ हजार ४३३ झाला आहे. सध्या २५ हजार ७६७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.