मुंबई - कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी व त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी फ्रंटलाइनवर डॉक्टरांसह अनेक आरोग्य सेवक काम करत आहेत. शासनाकडून वेळोवेळी या पॅरावैद्यकीय व चतुर्थ श्रेणी कामगारांना मास्क व पीपीई कीट पुरविल्याचे सांगितले जात आहे. मात्र शहर उपनगरातील पालिकेच्या विविध रुग्णालयांत काम करणाऱ्या आरोग्य सेवकांना कोणतेही सुरक्षा कवच नसल्याचे वारंवार समोर येत आहे. अहोरात्र कर्तव्य बजावताना सुरक्षेच्या अभावामुळे अजूनही आऱोग्यसेवकांच्या मनातील भय कायम असल्याची भावना आहे. त्यामुळे शासनाने या रुग्णालयीन आऱोग्य सेवकांना तातडीने सुरक्षा पुरवावी मागणी आहे.
जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील कोरोना कक्षात काम कऱणाऱ्या परिचारिकांनी मिळून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात रुग्णालयाच्या कोरोना कक्षात येणाऱे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे, मात्र असे असूनही परिचारिकांना मास्क, हँडग्लोव्ह्ज मिळत नसल्याची तक्रार केली आहे. उपचार करण्याची तयारी आहे, मात्र सुरक्षेसाठी त्वरित व्यवस्था करा अशी मागणी केली आहे. यापूर्वी कस्तुरबा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी व अन्य कामगारांनी मिळून रुग्णालय प्रशासनाकविषयी नाराजी व्यक्त केली होती. याविषयी, म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रदीप नारकर यांनी सांगितले की, कोरोना विषाणू बाधित रुग्ण आणि संशयित रुग्ण यांना सेवा देणाऱ्या चतुर्थश्रेणी कामगार-सफाईगार, कक्ष परिचर आणि परिचारिका यांना रुग्णालय प्रशासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रभाकर नारकर यांनी सांगितले. त्यांना पीपीई किट उपलब्ध होत नसल्यामुळे सेवा देणारे कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य सुरक्षा धोक्यात आले आहे.
रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवत नसल्याचा फटका नायर रुग्णालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांना बसला आहे. नायर रुग्णालयात कोरोना रुग्णाचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने हालचाल करुन परिचारिका व कर्मचाऱी असे मिळून १७ जणांना घरगुती अलगीकरण (होम क्वारंटाइन) केले आहे. हिंदुजा रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर जवळपास ८७ जणांना होम क्वारंटाइन केले होते. त्याचप्रमाणे, जसलोकच्या परिचारिकेलाही प्रवासाचा इतिहास नसताना कोरोनाची लागण झाली आहे. एकंदरित, कोरोनावर विजय मिळविण्याच्या प्रक्रियेतील डॉक्टरप्रमाणेच आऱोग्यसेवकही प्रमुख योद्धे आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षाकवच मिळणे हा त्यांचा हक्क आहे, तसे न झाल्यास कोरोनाची दहशत आणखी पसरण्याचा धोका आहे हे शासनाने ओळखले पाहिजे.