मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी कोरोनाच्या नवीन 9 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आज आढळलेल्या 9 रुग्णांपैकी 4 जण हे पुणे येथील पहिल्या 2 बाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेलेल्या चमूपैकी आहेत. यापैकी 1 रुग्ण अहमदनगरला, 2 यवतमाळला तर 1 जण मुंबईतील रुग्णालयात भरती आहे. तसेच, या चौघांशिवाय मुंबईत आणखी 4 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये हिंदूजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबईहून आलेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे. तर, मुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण हे अनुक्रमे अमेरिका व फ्रान्स आणि फिलिपाइन्सहून भारतात परतलेले आहेत.
याशिवाय, नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत असलेला आणि कतारहून देशात परतलेला 43 वर्षीय व्यक्ती सुद्धा कोरोना बाधित असल्याचा अहवाल आज इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे आज कोरोना बाधित आढळलेल्या 9 रुग्णांपैकी फक्त 1 जण महिला आहे. तसेच, राज्यात आज 131 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याशिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा , राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आहे. मात्र, यादरम्यान दहावीची परीक्षा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.