मुंबई : महाराष्ट्रात ठिकठिकाणी गारपीट होत असून, लॉकडाउनमुळे प्रदूषण कमी झाल्याने या गारांचा आकार पूर्वीपेक्षा वाढला आहे. परिणामी, येत्या काळात शेती व पूर नियंत्रणासाठी पूर्व नियोजन आवश्यक आहे, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
राज्याच्या हवामानात सातत्याने बदल होत असून, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे. दुसरीकडे लॉकडाउनमुळे बहुतेक व्यवहार बंद आहेत. त्यामुळे हवा प्रदूषित करणारे घटक उत्सर्जित होत नाहीत. परिणामी, मुंबईसह बहुतेक शहरांमधील हवेचा दर्जा समाधानकारक नोंदविण्यात येत आहे.हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, भौगोलिक परिस्थितीनुसार, उत्तरोत्तर गारांच्या आकारात वाढ होण्याची शक्यता असून, विखुरलेल्या विस्तृत स्वरूपात अशी गारपीट होण्याची शक्यता आहे.
लॉकडाउनमुळे संपूर्ण आशिया खंडात हवामानात मोठे बदल होतील. महाराष्ट्रातदेखील अशीच स्थित्यंतरे व बदल होत असल्याचे निदर्शनास येत आहे. संपूर्ण देशभरात ही प्रक्रिया पाहण्यास मिळेल. अनेक घटनांच्या अभ्यासाने आपण हे निष्कर्ष अधिक बळकटपणे सिद्ध करू शकतो. मात्र, तर्कसंगत किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करता असे होऊ शकते हे स्पष्ट आहे. कारण आजघडीला लॉकडाउनमुळे देशासह राज्यभरातील औद्योगिक क्षेत्र बंद असल्याने प्रदूषण अत्यंत कमी झाले आहे. प्रदूषणातील जे धूलिकण असतात ते जेव्हा जास्त प्रमाणात असतात, त्या वेळी ढगनिर्मिती प्रक्रियेत मोठे अडथळे येतात. परिणामी, ढग विरून जाऊन लवकर नष्ट होतात. ढगांची संख्या, आकार व उंची कमी झाल्याने पाण्याच्या थेंबाचे आकार व प्रमाण, गारांचे प्रमाण व आकार किंवा पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे औद्योगिक क्रांतीनंतर पाऊस व मान्सूनचा पॅटर्न सातत्याने बदलत गेल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले.बीकेसी, चेंबूरची हवा सुधारलीलॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. परिणामी, मुंबई शहराच्या हवेतील प्रदूषणाच्या पातळीत १७ मार्चपासूनच घट झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाउनमुळे हवा प्रदूषित करणारे घटक नियंत्रणात असल्याने मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी हवेची गुणवत्ता सुधारत आहे. बीकेसी, चेंबूर, माझगाव आणि चेंबूरसारख्या परिसरातील हवेची गुणवत्ता चांगली नोंदविण्यात येत आहे. यापूर्वी बीकेसी आणि चेंबूर येथील हवा सातत्याने खराब नोंदविण्यात आली होती. बिझनेस हब म्हणून ओळख असलेल्या बीकेसीने तर प्रदूषणाचा स्तर केव्हाच ओलांडला होता. मात्र, आता लॉकडाउनचा फायदा येथील प्रदूषण कमी करण्यासाठी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.आवळा, टोमॅटोएवढ्या गारामहाराष्ट्रात येत्या काळात गारांचा आकार वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ज्या गारा पडत होत्या किंवा पडत आहेत त्याचा आकार साबुदाणा किंवा फार तर वाटण्याएवढा होता. मात्र, आता जेव्हा महाराष्ट्रात गारपीट होईल तेव्हा गारांचा आकार आवळ्याच्या आकाराचा किंवा कदाचित टोमॅटोएवढाही असू शकतो. अशा गारा पडण्याची शक्यता वातावरणातील तापमान, वाºयाचा उर्ध्वझोत व भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात असेच होईल, असे आपण म्हणू शकत नाही. यावर्षी मे ते जूनअखेर या काळात गारपीटसह जोरदार पूर्वमान्सूनची शक्यता आहे. त्यामुळे आपण विशेषत: शेतीची काळजी घेण्याची गरज आहे. - किरणकुमार जोहरे,हवामान तज्ज्ञ