पुणे : कोरोनामुळे चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंचा पुरवठा थांबला असून, संपूर्ण बाजारसाखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पुढील काळात अनेक देश व कंपन्यादेखील आपले एका देशावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी सक्षम पर्याय शोधतील. याचाच फायदा घेत भारत हा युरोप, अमेरिकेला विविध वस्तूंचा पुरवठा करणारा देश म्हणून पुढे येईल. त्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडले.
कोरोनामुळे जगभर पुरवठासाखळी खंडीत झाल्याने अनेक उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. अमेरिका, युरोप आणि भारतासह अनेक कंपन्यांनी चीनमध्ये गुंतवणूक केली आहे. स्टील, इलेक्ट्रॉनिक, मोटार, रिटेल, रसायन, औषध आणि औषधाचा कच्चा माल, घरगुती वापराच्या वस्तू, लेदर उत्पादनांचा त्यात समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक, रसायन, चामडे अशा वस्तूंची मोठ्या प्रमाणावर भारतात आयात होते. ही ठप्प झाली आहे. त्यामुळे एका लेदर कंपनीने मुंबईतील एका लघु-मध्यम कंपनीला प्राधान्यक्रमाचा विक्रेत्याची पसंती देत अवघ्या २० दिवसांत नोंदणीची प्रक्रिया पार पाडली.
कोरोनामुळे चीनविषयी अढी निर्माण झाल्याचा फायदा भारताला होऊ शकतो. चीनमधून ज्या वस्तू व सेवांचा पुरवठा युरोप व अमेरिकन उपखंडात होतो त्यातील कोणत्या गोष्टी आपण करू शकतो, हे पाहून सरकारने धोरण आखले पाहिजे. कोरोनामुळे भारतालादेखील हे वर्ष मंदीचेच राहील. पुढील आर्थिक वर्षापासून त्यात सुधारणा होईल, अशी आशा कांबळे यांनी व्यक्त केली.
खेळत्या भांडवलासाठी नेमके आदेश हवेतरिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने काही सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात कर्ज हप्त्यांना ३ महिने स्थगिती दिली आहे. उद्योगांना या काळात खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. असे भांडवल देण्याची जबाबदारी मात्र बँकांवर सोपविली आहे. त्याबाबत स्पष्ट निर्देश देण्याची गरज आहे. खेळते भांडवल देण्याची मर्यादा २० टक्क्यांवरून ४० टक्के करावे, लघु उद्योगांना व्याजदरातही २ ऐवजी ५ टक्के सूट द्यावी, वीज दरात सवलत द्यावी, अशा मागण्याही कांबळे यांनी केल्या.