पुणे : राज्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचा फटका आता कारागृह प्रशासनाला बसल्याचे चित्र आहे. कारागृहातील कैद्यांमध्ये काेणाला काेराेनाची लागण झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे कच्च्या कैद्यांना तात्पुरता जामीन मंजूर व्हावा यासाठी न्यायालयाला विनंती करणार असल्याची माहिती राज्याच्या कारागृह विभागाचे महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी दिली.
पुण्यात आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. रामानंद म्हणाले, राज्यात एकूण 45 ठिकाणी 60 कारागृह आहेत. त्यात आजमितीला 38 हजार कैदी आहेत. राज्याच्या कारागृहातील साडेआठ हजार कैद्यांना शिक्षा झाली आहे. मात्र ज्यांच्यावर खटला चालू आहे किंवा जे कच्चे कैदी आहेत, त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध व्हायचा आहे त्यांना तात्पुरता किंवा नियमित जामीन मिळावा यासाठी न्यायालयात विनंती करणार आहाेत. अशा कैद्यांची यादी बनवून न्यायालयाकडे पाठविण्यात येणार आहे. असे केल्यास कारागृहातील गर्दी कमी करण्यास तसेच खबरदारी घेण्यास मदत हाेणार आहे.
दरम्यान पुढील 15 दिवस कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास बंदी घालण्यात आली आहे. फाेन किंवा व्हिडीओ काॅलद्वारे त्यांना घरच्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचबराेबर कारागृहांमध्ये काेराेनाला राेखण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून विविध उपाययाेजना करण्यात येत आहे. कारागृहात येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची दारात तपासणी करण्यात येणार आहे. काेणत्याही कर्मचाऱ्यांची किंवा कैद्यांची लक्षणे काेराेनसदृश्य दिसल्यास त्यांना तात्काळ विलगीकरण करण्यात येणार आहे.