मुंबई: राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावीच्या परीक्षेतील शेवटचा भूगोलाचा पेपर शालेय शिक्षण विभागाकडून 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. 31 मार्चनंतर याबाबतीत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी सोमवारी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर या पेपरवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर दहावीला असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली आहे.
सुरुवातीला नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोलाच्या पेपरचा निर्णय 31 मार्चनंतर घेण्यात येईल असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते. मात्र सोमवारी करण्यात आलेल्या देशभरातील लॉकडाऊनच्या घोषणेनंतर या परीक्षा होतील की नाही किंवा घ्याव्यात की नाही असा प्रश्न पालक, विद्यार्थी, शिक्षक साऱ्यांपुढे उभा राहिला आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर सीईटी सेलकडून होणारी 13 ते 23 एप्रिल दरम्यान होणारी परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होईल की नाही असा गोंधळ आणि चर्चा पालकांमध्ये रंगली आहे.
राज्य शिक्षण मंडळाने ज्या विषयांची परीक्षा झाली आहे, त्याच विषयाचे गुण ग्राह्य धरीत निकाल लावावा, 40 गुणांसाठी पुन्हा विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये असे मत सह्याद्री, कांदिवली येथे राहणारे पालक मंगेश कळंबे यांनी व्यक्त केले. तर आता पेपर होईल की नाही याबाबत आम्हाला शंकाच आहे, मात्र आम्ही एका विषयाचाच अभ्यास किती दिवस करत राहायचा असा सवाल दहावीच्या सुमेध रहाटे याने उपस्थित केला.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मूल्यांकनाच्या सरासरी गुणांवर त्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असाच निर्णय दहावीच्या भूगोलाच्या पेपरच्या बाबतीत घेता येईल का याची चाचपणी शिक्षण विभागाने करावी असा सूर पालकांमधून येत आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे आधीच पालक विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हा उरलेला पेपर घ्यायचाच हा हट्ट करण्यात अर्थ नाहीच. या ऐवजी योग्य निर्णय घेऊन वेळीच पालक विद्यार्थ्यांना दिलासा कसा देता येईल याच्या उपाय योजनांकडे शिक्षण विभागाने आता तरी लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया हंसराज मोरारजी पब्लिक स्कुलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली आहे.