सातारा: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. लॉकडाऊन सुरू असूनही कोरोनाग्रस्तांचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. या काळात वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस अहोरात्र सेवा देत आहेत. अनेक डॉक्टरांना, पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे. मात्र तरीही मोठ्या हिमतीनं हे कोरोना योद्धे नेटानं आपली कामगिरी पार पाडत आहेत. पोलीस दलातल्या अशाच दोन हवालदारांचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केलं आहे.राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पंधरा हजारावर पोहोचला आहे. साडे चारशे अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. अशा बिकट परिस्थितीतही पोलीस जीवावर उदार होऊन कर्तव्य पार पाडत आहेत. साताऱ्यातल्या दोन पोलीस हवालदारांनी कोरोना नियंत्रणात येत नाहीत तोपर्यंत एकही सुट्टी घेणार नसल्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून कौतुक केलं आहे.साताऱ्यातल्या शाहुपुरी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेल्या हवालदार निलेश दयाळ, सागर गोगावले यांनी पोलीस अधिक्षकांना पत्र लिहिलं आहे. हे दोन्ही कर्मचारी बॉम्ब शोधक आणि नाशिक पथकात काम करतात. सध्या कोरोनामुळे त्यांच्यावर बंदोबस्ताची जबाबदारी आहे. सध्या सातारा जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत एकही साप्ताहिक सुट्टी न घेण्याचा निर्णय दयाळ आणि गोगावलेंनी घेतला आहे. याबद्दलची माहिती त्यांनी पत्राद्वारे पोलीस अधिक्षकांना कळवली आहे.
CoronaVirus News: ...तोपर्यंत आम्ही एकही सुट्टी घेणार नाही; 'त्या' दोन हवालदारांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 12:00 PM