मुंबई : जगभरात घोंघावत असलेले कोरोनाचे वादळ आता ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत घोंगावू लागले आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता १०३ वर जाऊन पोहोचली असून चौघांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत सापडले असून पहिला क्रमांक लावणाऱ्या पुण्यासाठी दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे.
दुबईहून मुंबईत आलेले पुण्याचे कुटुंबीय कॅबने पुण्याला गेले होते. महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त हेच कुटुंबीय होते. यामुळे त्यांना पोहोचविणाऱ्या कार चालकालाही ताब्यात घेण्यात आले. त्याला कोरोना झाल्याचे समजताच राज्यात हडकंप उडाला होता. यानंतर ही कॅब वापरणाऱ्या मुंबईतील वृद्ध प्रवाशालाही कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. हळूहळू हे लोन महाराष्ट्रभर पसरू लागले. मुंबई, नागपूरनंतर काल सांगलीच्या इस्लामपूरातही कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीमध्येही एक रुग्ण आहे. हे सर्वजण परदेशातून आलेले असले तरीही शनिवारी पुण्यातील महिलेला परदेशात न जाताही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.
कारण ही कोरोनाची तिसरी स्टेज असून त्यामध्ये अद्याप प्रवेश केलेला नसला तरीही या स्टेजमध्ये कोरोना गेल्यास मोठे संकट उभे राहणार आहे. आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येणार आहे. यामुळे महाराष्ट्रात आधी १४४ कलम लागू करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाईलाजास्तव संचारबंदीच लागू केली आहे. काही ठिकाणी पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना लाठीचा प्रसादही दिला आहे.
पण गेल्या काही दिवसांत सापडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा विचार केल्यास मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे. कारण मुंबईत गेल्या १५ दिवसांत ४० हून अधिक रुग्ण पॉझिटीव्ह सापडले आहेत. ही आकडेवारी पहिल्या १० रुग्णांनंतर नोंदविली गेलेली आहे. गेल्या चार दिवसांत १२ वरून हा आकडा ४० वर पोहोचला आहे. तर राज्यात यवतमाळ, नागपूर, औरंगाबाद आणि ठाण्यामध्ये एक दोन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे कोरोनाचे केंद्र मुंबईअसून त्यांनंतर पुण्याचा क्रमांक लागत आहे. ही आकडेवारी सीपीसी अॅनॅलिटीक्स वरून घेतलेली आहे.
पुणेकरांना काहीशी दिलासादायक आकडेवारी आहे. पुण्यामध्ये गेल्या १५ दिवसांमध्ये २८ च्या आसपास रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची संख्या ही काही प्रमाणात स्थिर असून १९ तारखेनंतर मोठी वाढ पहायला मिळली आहे. जिथे मुंबईत गेल्या दोन दिवसांत १४ रुग्ण सापडले तिथे पुण्यामध्ये केवळ दोन रुग्णांची भर पडली आहे. २२ आणि २३ तारखेला कमी रुग्ण आढळले आहेत. यामुळे आयटी आणि औद्योगिक हब असलेल्या पुणेकरांसाठी काहीशी दिलासा देणारी आकडेवारी आहे. असेच वातावरण राहिल्यास पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात राहणार आहे. पुण्यामध्ये पोलिसांनी सरकारच्या आधीच संचारबंदी जारी केली होती.