पुणे : जगभरात शंभरहून देशांमध्ये काेराेनाचा प्रसार झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. बाहेरच्या देशामधून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन त्यांना क्वाआरनटाईन करायचे किंवा आयसाेलेशन वाॅर्डमध्ये ठेवायचे याचा निर्णय घेतला जाताे. गेल्या काही दिवसांपासून या दाेन शब्दांचा वापर अनेकवेळा झाला आहे. एखाद्याला काेराेनाची लागण झाली असल्यास ती इतरांना हाेऊ नये यासाठी या दाेन प्रक्रीया वापरल्या जातात. त्यामुळे क्वाआरनटाईन आणि आयसाेलेशन केलं जातं म्हणजे नेमकं काय केलं जातं हे आपण जाणून घेऊयात
इन्स्टिट्युशनल क्वारनटाईन काेराेनाचा प्रसार बाहेरील देशातून येणाऱ्या नागरिकांमुळे हाेत आहे. जगभरातील काेराेनाबाधित देशांमध्ये प्रवास करुन आलेल्या काही नागरिकांना काेराेना झाल्याची लक्षणे आढळून आली. काेराेनाची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्यासाठी 1 ते 14 दिवसांचा कालावधी लागू शकताे. केंद्र सरकारने सात देशांना सर्वाधिक काेराेनाबाधित देश म्हणून घाेषित केले आहे. तेथून आलेल्या नागरिकांनमध्ये काेणाला काेराेनाची लक्षणे आढळल्यास त्यांना विमानतळावर क्वारनटाईन करण्यात येते. म्हणजे त्या नागरिकांना काही काळासाठी सरकारने उपलब्ध केलेल्या ठिकाणी ठेवण्यात येते. तसेच त्यांच्यात कुठली काेराेनाची लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात येते. काही दिवसांनंतर काेराेनाची लक्षणे न दिसल्यास साेडून देण्यात येते. दरम्यान इन्स्टिट्युशनल क्वारनटाईनमध्ये नागरिकांना सर्व साेईसुविधा सराकरकडून उपलब्ध करुन दिल्या जातात.
हाेम क्वारनटाईनकेंद्र सरकारने जाहीर केलेल्या काेराेनाबाधित देशातून आलेल्या नागरिकांची तपासणी विमानतळावर करण्यात येते त्यांच्यात जरी काेराेनाची लक्षणे आढळली नसली तरी त्यांना हाेम क्वारनटाईन करण्यास सांगण्यात येते. त्यांच्या हातावर तसा शिक्का मारण्यात येताे. याचा अर्थ अशा नागरिकांना स्वतःच्या घरातच काळजी घेऊन इतर नातेवाईकांपासून लांब राहायचे असते. अनेकदा काेराेनाची लक्षणे दिसण्यास 14 दिवसांचा देखील कालावधी लागू शकताे. त्यामुळे अशा नागरिकांनी 14 दिवस घराबाहेर न पडता तसेच घरच्यांशी देखील अंतर ठेवून घरात स्वतःला क्वारनटाईन करुन घ्यायचे असते.
आयसाेलेशन परदेशातून आलेल्या ज्या नागरिकांना काेराेनाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यांना सरकारच्या आयसाेलेशन विभागात ठेवण्यात येते. तेथे त्यांची काेराेनाबाबतची तपासणी करण्यात येते. तसेच त्यांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर येताच त्यांच्यावर उपचार केले जातात. रुग्ण बरा हाेईपर्यंत त्यांना आयसाेलेट करुन त्यांच्यावर उपचार केले जातात. सर्व शहरांमधील ठराविक सरकारी दवाखान्यांमध्ये आयसाेलेशन वार्ड तयार करण्यात आले असून तेथे अशा नागरिकांना ठेवण्यात येते.