मुंबई : विधान परिषद निवडणुकीत एका अपक्षाचा अर्ज बाद ठरला, तर चौघांनी माघार घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नीलम गोºहे (शिवसेना), शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी (राष्ट्रवादी), राजेश राठोड (काँग्रेस) तर रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटके (भाजप) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मंगळवारी छाननीच्या दिवशी शेहबाज राठोड या अपक्ष उमेदवारांचा अर्ज बाद झाला. तर भाजपचे संदीप लेले आणि डॉ. अजित गोपछेडे, राष्ट्रवादीचे किरण पावसकर, शिवाजीराव गर्जे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी चार अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती; त्यांनी अर्जही भरले होते; पण त्यातील नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना माघार घ्यायला लावून डमी अर्ज भरलेले रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली.गोपछेडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले आहेत. गेली तीस वर्षे ते एकनिष्ठेने भाजपचे काम करतात. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्टेथोस्कोप गळ्यात टाकूनच ते आले होते. त्याची बरीच चचार्देखील झाली. मात्र, आज त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास पक्षाने सांगितले.रमेश कराड हे पूर्वी भाजपमध्ये होते. नंतर ते राष्ट्रवादीत गेले आणि पुन्हा भाजपमध्ये परतले. पुण्यातील एमआयटी या मोठ्या शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वनाथ कराड यांचे ते पुतणे आहेत. कराड हे वंजारी समाजाचे आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून या समाजाकडे भाजपची व्होटबँक म्हणून बघितले जाते. मात्र, या निवडणुकीत मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली नाही. त्याची तीव्र प्रतिक्रिया वंजारी समाजात उमटली. सोशल मीडियात भाजप नेत्यांना गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. त्यामुळे वंजारी समाजाचे समाधान करण्यासाठी गोपछेडे यांना बाजूला करत रमेश कराड यांना उमेदवारी दिली गेली, असे म्हटले जाते. अशावेळी बळी देण्यासाठी कोण सोपे, हे बघून गोपछेडे यांना बाजूला करण्यात आले, अशी चर्चा आहे.कोण आहेत रमेश कराड?रमेश कराड हे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक. दीर्घकाळ ते भाजपमध्ये आहेत. पुण्यातील एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वनाथ कराड यांचे ते पुतणे. एमआयटीच्या लातूरमधील शिक्षण संस्थांचा कारभार रमेश कराड बघतात. लातूर ग्रामीणमधून दोन वेळा विधानसभेचे निवडणूक लढले पण पराभूत झाले. उस्मानाबाद-लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असताना अचानक माघार घेऊन त्यांनी राष्ट्रवादीची कोंडी केली होती.भाजपच्या विधानपरिषदेच्या चार उमेदवारांपैकी एक प्रवीण दटके हेच निष्ठावंत आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले. गोपीचंद पडळकर यांचा प्रवास भाजप-वंचित बहुजन आघाडी पुन्हा भाजप असा आहे. रमेश कराड हे भाजप-राष्ट्रवादी-भाजप असा प्रवास केलेले आहेत. निष्ठावंत गोपछेडे यांच्याबाबत मात्र ‘घर की मुर्गी दाल बराबर’ असे झाले.
चुका भोगत आहे -खडसेलॉकडाऊननंतर पक्षश्रेष्ठींशी आपण चर्चा करू आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ. आजही १६-१७ आमदार आपण म्हणू ते करण्यास तयार आहेत, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आपण भूमिका बजावली होती. त्यांना विधानसभेत प्रोत्साहन दिले.काही चुका मी आता भोगत आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
काँग्रेसची आॅफरहोती : एकनाथ खडसेकाँग्रेस पक्षाने आपल्याला विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी देऊ केली होती. भाजपच्या सहा-सात आमदारांनी ते आपल्यासाठी क्रॉसव्होटिंग करण्यास तयार आहेत, असे फोनही केले होते; पण वेळ कमी होता. त्यामुळे निर्णय घेऊ शकलो नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.