मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,49,65,463 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,81,386 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,106 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,74,390 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 54 लाखांवर गेली असून आतापर्यंत 82 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याच दरम्यान दिलासादायक आकडेवारी समोर आली असून महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे,.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सोमवारी (17 मे) कोरोनाचे 26,616 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 516 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 54,05,068 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 82,486 वर पोहोचला आहे. तब्बल 48 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 48,74,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 4,45,495 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होताना दिसून येत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 28 लाख 41 हजार 349 लोकांनी लस घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण ज्येष्ठ नागरिकांचे असून 11 लाख 33 हजार 628 ज्येष्ठांनी लस घेतली आहे. लसचा साठा मर्यादित स्वरूपात येत असल्याने केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने ऑनलाईन नोंदणी बंधनकारक केली. मात्र ऑनलाईन वेळ मिळण्यास अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेने 17 ते 19 हे तीन दिवस केंद्रावर थेट लस घेण्याची सुविधा उपलब्ध केली होती. मात्र चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शनिवार ते सोमवार लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली.