मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटीचा टप्पा पार केला असून चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. काही राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याची माहिती आता समोर आली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,391 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 80 जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी (18 सप्टेंबर) कोरोनाचे 3,391नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 80 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा देखील वाढला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 3,841 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तर राज्याचा रिकव्हरी रेट 97.09 टक्क्यांवर आहे.
धोका वाढला! सणसमारंभाच्या काळात डेल्टा व्हेरिएंटचा कहर?; येणारे 3 महिने ठरू शकतात घातक
सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं. त्यामुळे या काळात लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे.
घरच्या घरीच सण साजरे करा. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यातच डेल्टा व्हेरिएंट देखील थैमान घालून शकतो. जर लोकांनी सणसमारंभामध्ये कोरोना नियमावलीचं पालन केलं नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.