मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका पाहायला मिळत आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 64 लाखांवर गेली असून आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याच दरम्यान दिलासादायक आकडेवारी समोर आली असून महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी (10 सप्टेंबर) कोरोनाचे 4154 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 44 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 64,91,179 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,38,061 वर पोहोचला आहे. तब्बल 62 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 62,99,760 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 49,812 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होताना दिसून येत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
बाप्पा घेऊन आला 'सुखवार्ता'... तिसऱ्या लाटेची शक्यता कमीच
सणासुदीच्या दिवसांनंतर देशात कोरोना साथीची स्थिती आणखी बिकट होईल, अशी शक्यता लक्षात घेऊन सध्या तशी पूर्वतयारी केली जात आहे. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची तूर्त तरी शक्यता नाही, असे केंद्र सरकारने नेमलेल्या कोरोनाविषयक तज्ज्ञगटाचे प्रमुख प्रा. एन. के. अरोरा यांनी सांगितले. त्यांच्या या उद्गारांनी करोडो भारतीय नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरपर्यंत कोरोना लसीचे 110 कोटींहून अधिक डोस लोकांना दिले जाण्याची शक्यता आहे.लसीकरण मोहिमेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष तसेच इंडियन सार्स-कोव्ह-2 जिनोमिक्स कॉन्सोर्टियमचे सहअध्यक्ष असलेल्या प्रा. एन. के. अरोरा यांनी दिलासा देतानाच सावध राहण्याचा इशाराही दिला आहे.
सध्या दररोज कोरोना लसीचे 85 लाख ते एक कोटीहून अधिक डोस देण्यात येत आहेत. अशा वेगाने मोहीम राबवली गेल्यास सर्व प्रौढ व्यक्तींना लसीचा पहिला डोस तरी मिळालेला असेल. मात्र, अजूनही 30 टक्के लोकांना लस मिळाली नसल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन जनतेने सणासुदीच्या दिवसांत व नंतरही प्रतिबंधक नियमांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन प्रा. एन. के. अरोरा यांनी केले. गेल्या काही आठवड्यांत भारतामध्ये दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांचे प्रमाण 30 ते 45 हजारांच्या दरम्यान आहे. त्यातील सर्वाधिक रुग्ण केरळ, ईशान्य भारतातील काही राज्ये व महाराष्ट्र, दक्षिण भारतातील राज्यांच्या काही जिल्ह्यांत सापडत आहेत.