मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. हा कालावधी १४ एप्रिलला संपणार आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता लॉकडाऊन वाढवण्याची गरज जवळपास काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. या बैठकीनंतर लॉकडाऊन वाढवायचा की नाही, याबद्दलची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात येईल.पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून राज्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबतच पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली.देशातील कोरोनाबाधितांची संख्या साडे सात हजाराच्या पुढे गेली असून यातील जवळपास २० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. या आकडेवारीचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी राज्यातला लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करावी, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदींशी संवाद साधताना मांडलेली भूमिका पाहता राज्यातलं लॉकडाऊन वाढवलं जाण्याची दाट शक्यता आहे.
CoronaVirus: राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढणार?; मोदींसोबतच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी दर्शवली तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 12:42 PM