मुंबई : देशभरात केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविलेले आहे. आज काही अटींवर अन्य दुकानांनाही परवानगी दिली असून यातून शहरी भाग वगळला आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे ही दोन मोठी आणि महत्वाच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यू वाढते आहेत. यामुळे याठिकाणचा लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई आणि पुण्यातील तसेच आसपासच्या शहरांमधील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे राज्य सरकार येथील लॉकडाऊन जूनपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले आहे. मुंबई आणि पुण्यातील एमएमआर परिसरातील लॉकडाऊन उठण्याचा प्रश्नच येत नाही. या शहरांमध्ये रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. यामुळे तेथील बंदोबस्त आणखी कडक करण्याची गरज आहे. लोकल ट्रेन, बस, दुकाने आणि आस्थापनांवरील बंदी जून संपेपर्यंत राहणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. याबाबतचे वृत्त ईकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.
वाढती रुग्णसंख्या महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी ठरत असून यामुळे अर्थचक्र सुरु करण्यामध्ये अडथळा ठरत आहे. राज्याचे मुंबई आणि पुणे ही दोन शहरे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. एकट्या मुंबईतच कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ५ हजारावर गेला असून दिवसाला २०० रुग्ण एवढ्या सरासरीने रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी पुणे परिसरात १०४ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. पुण्यामध्ये तर आठवड्यातून दोन दिवसच दूध, भाजीपाला देण्यात येत आहे. केंद्रीय समितीने तर पुण्यामध्ये मे संपेपर्यंत मोठ्या प्रमाणावर क्वारंटाईनची सुविधा उभी करण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये ९८३ कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. यापैकी निम्म्याहून जास्त झोन हे झोपडपट्टीमध्ये आहेत. राज्यातील अन्य भागांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नाशिकच्या मालेगावमध्ये आतापर्यंत शंभरावर रुग्ण सापडले आहेत. नागपूरमध्येही हा आकडा १०० वर गेला आहे.
आणखी वाचा...
CoronaVirus चीनचा कांगावा! म्हणे "आमचे टेस्टिंग किट उत्तम, भारतीयांनाच वापरायचे ज्ञान नाही"
देशभरात काही अटींवर अन्य दुकाने उघडणार; दारुच्या दुकानांबाबत घेतला हा निर्णय
मोठा दिलासा! आजपासून सर्व दुकाने उघडणार; शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स बंदच राहणार
किम जोंग उन अत्यवस्थ नाहीत; तरीही उपचारासाठी चीनने पाठविली डॉक्टरांची फौज