किन्हीराजा (वाशिम): ''साहेब आमच्याकडे किट नाही, मास्क नाही, सॅनिटायझर नाहीत. कामाचा प्रचंड तणाव आहे. तुम्ही मुख्यमंत्री असता तर आमच्यावर आज ही वेळ आली नसती'', अशा भावना जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्हीराजा येथे हायवेवर पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केल्या.
रविवारी नागपूरहून मुंबईला जात असताना खंडेराव मुंढे यांच्या विनंतीस मान देऊन देवेंद्र फडणवीस हे किन्हीराजा येथील शिवाजी हायस्कूलजवळ पाच मिनिटं थांबले. तालुक्यातील शेतकऱ्यांची त्यांनी आपुलुकीने विचारपूस केली. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, कोरोनाला दूर ठेवा, पोलीस अहोरात्र सेवा देत आहेत, त्यांनीही योग्य तऱ्हेनं आपला बचाव करावा, असं त्यांनी आस्थेनं सांगितलं. ते निघत असतानाच, एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली किट्स, मास्क किंवा सॅनिटायझर यासारख्या वस्तू आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या नाही, याकडे त्यानं लक्ष वेधलं. तुम्ही मुख्यमंत्री असता, तर ही वेळ आली नसती, असंही हा पोलीस कर्मचारी म्हणाला. त्याचं म्हणणं फडणवीसांनी ऐकून घेतलं.
दरम्यान, कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या, राज्यात ३१ मेपर्यंत वाढवण्यात आलेला लॉकडाऊन, पोलीस यंत्रणेवर येणारा ताण, त्यांच्यापैकी काहींच्या घरापर्यंत पोहोचलेलं कोरोनाचं संकट काळजीत टाकणारं आहे. त्यादृष्टीने केंद्राला विनंती करून अन्य राज्यांमधून किंवा दिल्लीहून अतिरिक्त कुमक मागवण्याचा विचार राज्य सरकार करतंय. मात्र, 'ऑन ड्युटी २४ तास' असलेल्या पोलिसांपर्यंत मास्क, सॅनिटायझर या मूलभूत गोष्टी पोहोचवण्याकडेही सरकारने अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.
हेही वाचा...
२६/११ च्या हल्ल्यातील साक्षीदार हरिशचंद्र श्रीवर्धनकर यांना भाजपाकडून १० लाखांचा चेक
कोरोना लढ्यात प्राण गमावणाऱ्या योद्ध्यांना ‘शहीद’ असे संबोधा...!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
...मग महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे; भाजपा आमदाराचा राज्य सरकारला सूचक इशारा