अतुल कुलकर्णी
मुंबई : महाराष्ट्रात सध्या ज्या ठिकाणी रेडझोन घोषित करण्यात आले आहेत आणि जेथे कोरोना बाधितांची संख्या रोज नव्याने वाढत आहे, त्या ठिकाणी ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यावर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत एकमत झाले आहे. तसा प्रस्ताव आता केंद्र सरकारला राज्याकडून पाठवला जाणार आहे. त्यासोबतच कोणत्या भागात रेड झोन जाहीर करायचा, याचे अधिकार राज्य सरकारला असावेत असेही या पत्रात लिहिण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची या बैठकीला उपस्थिती होती. महापौर बंगल्यावर झालेल्या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली. परदेशातून काही उद्योजक महाराष्ट्रात उद्योग करण्यासाठी उत्सुक आहेत. त्याकरता राज्याच्या उद्योग विभागाचे धोरण कसे असावे, त्यात कोणते बदल करावेत, यावरही या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच परिवहन विभागाची कार्यालये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याच्या दृष्टीने आणि महसुलात वाढ करण्यासाठी कोणकोणते विभाग कोणत्या झोनमध्ये सुरू करता येतील यावरही विस्तृत चर्चा झाल्याचे ते चव्हाण म्हणाले.
देशपातळीवर १७ मे लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. तो वाढवताना केंद्र सरकार कोणती भूमिका घेते, त्यानुसार महाराष्ट्रात कोणती पावले उचलायची यावर निर्णय घ्यावा असे बैठकीत ठरले. केंद्रसरकारने रेड झोन ठरवताना जिल्हा म्हणून विचार केला आहे. मात्र, कंटेनमेंट एरिया नुसार कोणता झोन कुठे ठेवायचा आणि कोणत्या ठिकाणी ग्रीन, ऑरेंज झोन करायचे याचा निर्णय राज्याने घ्यावा यासाठी केंद्राने अडकाठी आणू नये, असेही केंद्र सरकारला कळवण्याचे या बैठकीत ठरले.
मुंबईत लोकल रेल्वे सुरू करण्याविषयी घाई करू नये. जर लोकल सुरू झाल्या तर परिस्थितीवर नियंत्रण आणणे कठीण जाईल. मात्र, सरकारी कार्यालयांमध्ये जेवढे लोक येणे आवश्यक आहे किंवा आरोग्य सेवा, पोलिस प्रशासन, महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्यासाठी लोकल सुरू ठेवताना मर्यादित फेऱ्या चालवण्यात याव्यात. ओळखपत्र किंवा विशेष पास शिवाय लोकलमध्ये कोणालाही प्रवेश देऊ नये. या अटीवर त्या सुरू करण्याची शिफारसही राज्याने केंद्र सरकारला केली आहे. १७ मे पर्यंत देशपातळीवर लॉकडाऊन आहे १८ मे रोजी सोमवारी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक घ्यायची, आणि त्यात पुढील निर्णय जाहीर करायचे, असे ठरल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus in Mumbai मुंबई हादरली! आज नवे रुग्ण हजारासमीप; मृत्यू मात्र घटले
CoronaVirus बापरे! राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पहिल्यांदाच १६०० पार; मृत्यू घटले
बाबो! हायवेला जागा गेली; 400 कोटींची भरपाई पाहून एकाच नावाचे १३ दावेदार प्रकटले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'आमदार' झाले; ९ जणांचे विधान परिषद सदस्यत्व जाहीर
Atmanirbhar Bharat Abhiyan देशात कुठेही रेशनचे धान्य मिळणार, कामगारांना भाडेकरारावर घरं देणार
अवघा देश भिकेला लावला; आता पाकिस्तानी सैन्याला दणक्यात पगारवाढ हवीय