विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाचे संकटवाढत असताना आता लॉकडाउनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार असून यावर राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सर्वचमंत्र्यांचे एकमत झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्याचा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उठवावे तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही, त्या जिल्ह्यांना लॉकडाउनमधून वगळावे, असा सूर मंत्रिमंडळाच्या आधीच्या बैठकीत व्यक्त झाला होता.
मात्र गेल्या चार दिवसांतमुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच नव्याने काही जिल्ह्यांमध्येकोरोनाचा शिरकाव झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन १४ एप्रिलला संपेल, अशी शक्यता संपुष्टात आली आहे. लॉकडाऊन वाढवण्याबाबतचा निर्णय ११ एप्रिलला होईल, अशी शक्यता आहे.
पाच तुरुंग लॉकडाउनकोरोनाग्रस्त भागातील पाच तुरुंग आजपासून लॉकडाउन करण्यात आले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमतला ही माहिती दिली. या तुरुंगामध्ये मुंबई सेंट्रल, ठाणे, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह आणि कल्याण जिल्हा कारागृहाचा समावेश आहे. या ठिकाणी जे पोलीस कर्मचारी आज आहेत ते तेथेच राहतील. त्यांच्या घरच्यांशी ते मोबाइलवर बोलू शकतील. लॉकडाउन कालावधीत या तुरुंगाचे मेन गेट उघडण्यात येणार नाही.