Coronavirus In Maharashtra : राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना करोनाची लागण; अजित पवार यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 11:07 AM2022-01-01T11:07:56+5:302022-01-01T11:08:20+5:30
Coronavirus In Maharashtra : रुग्णसंख्या अशीच वाढच राहिल्यास कठोर निर्बंध लावण्याचे पवार यांचे संकेत.
Coronavirus In Maharashtra : गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा (Coronavirus Patients) खाली येणार आलेख आता पुन्हा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. तर दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा विषाणूसह (Delta Variant), ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्याही वाढता दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील मंत्रिमंडाळातील काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. "जर यापुढेही राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत राहीली तर राज्य सरकार आणखी कठोर निर्बंध घालू शकते," असे संकेतही पवार यांनी दिले.
If the number of #COVID patients keep increasing in the state then the government may have to impose more restrictions, Maharashtra Deputy CM Ajit Pawar added
— ANI (@ANI) January 1, 2022
"अधिवेशनाच्या कालावधीत केवळ पाच दिवसांमध्ये १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच राज्य सरकारनं कोरोनाची नवी नियमावली जाहीर केलीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नियमांचं भान ठेवलं पाहिजे," असंही ते म्हणाले.
'दुसऱ्या लाटेची किंमत मोजलीये'
"प्रत्येकाला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे व्हावं असं वाटतंय. पण नव्यानं आलेला कोरोनाचा व्हेरिअंट वेगानं पसरत आहे. अमेरिका फ्रान्स, इंग्लंड येथे दररोज लाखो रुग्ण सापडत आहे. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमतही मोजली आहे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी सरकारही प्रयत्न करतंय. आताच नियम कडक का असा आग्रह करु नये, सर्वांनी सहकार्य करावं," असंही पवार म्हणाले.