मुंबई - राज्यात डेल्टा प्लस(Delta Plus Variant) विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
या संदर्भात अधिक माहिती देतांना राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच या इंडेक्स केसेसची संपुर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासिताची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे असंही राजेश टोपे म्हणाले.
राज्यात आज ६ हजार २७० कोरोनाबाधितांची नोंद
राज्यात आज १३ हजार ७५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ६ हजार २७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याचसोबत ९४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५७ लाख ३३ हजार २१५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८९% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९६ लाख ६९ हजार ६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९ लाख ७९ हजार ०५१ (१५.०७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्या एकूण १ लाख २४ हजार ३९८ इतकी आहेत.
१८ वर्षावरील नागरिकांचं उद्यापासून लसीकरण
कालपर्यंत महाराष्ट्रात ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींच लसीकरण करत होतो. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे अठरा पासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाला आपण लसीकरणाला मान्यता आजपासून देत आहोत त्यामुळे महाराष्ट्राच्या तरुणाईला मला यानिमित्ताने सांगावसं वाटतं की आपण आपापल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन अठरा वर्षाच्या पुढील युवक-युवती पासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण करणं शक्य आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली.