मुंबई : राज्यात नव्याने कोरोनाबाधित होणाऱ्यांच्या संख्येचा आलेख वाढतच आहे. रविवारी १,६४८ नव्या बाधितांची नोंद झाली असून, ९१८ जण काेरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात १७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधित रुग्ण संख्या ६६,५७,८८८, तर कोरोनातून ६५,०२,९५७ जण बरे झाले आहेत. राज्यभरात ९,८१३ सक्रिय रुग्ण आहेत. ८९,२५१ व्यक्ती गृहविलगीकरणात असून, ८९१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
‘ओमायक्रॉन’ १४१ वरराज्यात दिवसभरात ‘ओमायक्रॉन’चे ३१ रुग्ण आढळले असून, आतापर्यंतची संख्या १४१ वर पोहोचली. आजच्या ३१ रुग्णांत सर्वाधिक २७ मुंबईत, २ ठाण्यात आणि पुणे ग्रामीण व अकोला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ६१ रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आले आहे.
९२२ नव्या कोरोनाच्या रुग्णांची मुंबईत नोंद
मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत रविवारी ९२२ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एकाला दीर्घकालीन आजार होते. दुसरी रुग्ण महिला होती. तर ३२६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईत सक्रिय रुग्ण ४,२९५ आहेत. येथील सक्रिय कंटेन्मेंट झोनची संख्या शून्य असून, सक्रिय सीलबंद इमारती २२ आहेत. धारावीतही ३ तर दादर येथे १२ रुग्णांची नोंद झाली आहे.