मुंबईः महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या कोरोना संसर्गाकडे लक्ष वेधत भाजपाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारला लक्ष्य करत आहेत. त्यात अर्थातच, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. ‘महाराष्ट्र बचाओ’ अभियानांतर्गत त्यांनी राज्य सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. सुरुवातीला राज्यपालांकडे तक्रार करून, नंतर वेगवेगळे आकडे मांडत ते सरकारचं अपयश दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावरून, भाजपा आणि शिवसेना या जुन्या मित्रांमध्ये नवं भांडणं सुरू झालंय. अशावेळी, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज विरोधी पक्षाकडून असलेल्या अपेक्षा आणि त्यांची जबाबदारी याबद्दल रोखठोक मतं मांडली. देवेंद्र फडणवीसांनाउद्धव ठाकरेंसोबतच्या मधुर संबंधांची आठवण करून देत, कोरोना संकटात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
राजभवनातल्या गंजलेल्या तोफांतून कुणी हल्ले करणार असतील, तर...; संजय राऊत यांनी सोडला बाण
राज्यात राजकीय हालचालींना वेग; गेल्या ३-४ दिवसांत नेमकं काय घडल्या मोठ्या घडामोडी?
राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, संजय राऊत यांनी ‘लोकमत’ला विशेष मुलाखत दिली. विरोधी पक्षनेत्याचं पद हे महाराष्ट्रात कायमच प्रतिष्ठेचं राहिलंय. प्रतिभाताई पाटील, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी, एकनाथ खडसे यासारख्या नेत्यांनी हे पद सांभाळलंय आणि वेळोवेळी योग्य भूमिका घेऊन सरकारला काम करायला भाग पाडलंय. देवेंद्र फडणवीस हे तर गेली पाच वर्षं सत्तेत होते, त्याआधी विरोधी पक्षात होते. त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांनी राज्यपालांना भेटण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना भेटून सरकारला त्यांच्या अनुभवाचा फायदा करून द्यायला हवा, अशी सूचना त्यांनी केली.
केंद्राकडून महाराष्ट्राला काय काय मिळालं?; फडणवीसांनी भलीमोठी यादीच वाचून दाखवली
‘मातोश्री’वर रश्मी ठाकरे यांच्या हातची साबुदाण्याची खिचडी आणि वडे खाल्ल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ पुरस्कार सोहळ्यात सांगितली होती. तो संदर्भ घेत संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध चांगले आहेत. दोन्ही पक्ष पाच वर्षं एकत्र सत्तेत सहभागी होते. फडणवीस मातोश्रीवर यायचे तेव्हा रश्मी वहिनी त्यांना साबुदाण्याची खिचडी, वडे देत असत. इतके मधुर संबंध असताना टोकाची भूमिका घेणं लोकांना पटणारं नाही. इतक्या मोठ्या संकटात दोन-चार गोष्टी इकडे-तिकडे होत असतील तर राज्य सावरण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेतेपदावरही आहे. त्यांनी मोकळेपणाने सरकारशी संवाद साधला पाहिजे. ते जर सरकारसोबत उभे राहिले तर या संकटाची तीव्रता कमी व्हायला मदत होईल, असंही राऊत यांनी नमूद केलं.
“...तर कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल”
संजय राऊत यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट, भेटीनंतर म्हणाले...
सत्ता गेल्याच्या सुतकातून भाजपाने बाहेर पडलं पाहिजे. ही सापशिडी आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाही. आपणही राज्यकर्ते होतो. ही राजकारणाची वेळ नाही, हे समजून विरोधी पक्षाने जनतेचा आवाज मांडायला हवा. विरोधासाठी विरोध करण्याच्या भूमिकेतून बाहेर येत नाहीत, तोपर्यंत या विरोधी पक्षाने पुन्हा सत्तेवर येण्याचं स्वप्न पाहणं हा गुन्हा आहे, असंही त्यांनी सुनावलं.
पंतप्रधान, गृहमंत्री तरी कुठे बाहेर पडलेत?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संकटसमयी घराबाहेरही पडत नसल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. मात्र, फार घराबाहेर पडू नका, असे आदेश स्वतः पंतप्रधानांनीच दिलेत. खुद्द पंतप्रधान, गृहमंत्री आणि बहुतेक सगळेच मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत आहेत, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याऐवजी विरोधी पक्षनेत्यांनीही घरात थांबूनच काम करण्याच्या सूचनेचं पालन करावं. राज्यपालांना भेटून त्यांना अडचणीत का आणता?, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
"...मग यादी कसली मागताय? राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय, हे विसरू नका"
स्थलांतरित मजुरांच्या प्रवासासंबंधी आवश्यक त्या याद्या सरकारने रेल्वे महाव्यवस्थापकांना दिल्या होत्या. एखाद्याला या विषयाचं राजकारण करायचंच असेल तर पूर्ण मुभा आहे. पण, महाराष्ट्र हे प्रमुख राज्य आहे, केंद्राला सातत्याने आर्थिक पाठबळ देत आलंय. त्यामुळे सरकार कुणाचं आहे हे न पाहता केंद्राने सर्वाधिक लक्ष देणं गरजेचं आहे. हे राज्य अडचणीत यावं अशी भूमिका कुणी घेत असेल तर ते देशाच्या हिताचं नाही, अशी चपराकही राऊत यांनी लगावली.