मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाउनसंदर्भातील प्रतिबंध 31 जानेवारी 2021पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नवे वर्ष साजरे करण्यासाठी कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहनही सरकारने केले आहे.यासंदर्भात, राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने परिपत्रक जारी करत, लोकांनी आपल्या घरात राहूनच साध्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करावे, तसेच समुद्र किनारी, उद्याने आणि रस्त्यावर जाणे टाळावे, असे म्हटले आहे.
या परिपत्रकात, विशेषत्वाने दहा वर्षांच्या आतील मुले आणि 60 वर्षांवरील वृद्धांना, महामारीच्या पार्श्वभूमीवर नवे वर्ष साजरे करण्यासाठी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नव्या वर्षानिमित्त मुंबईतील मरीन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया, गिरगांव आणि जुहू आदी ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमतात.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेली नियमावली -- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आवाहन करण्यात येते, की नव्या वर्षाचे स्वागत कोलांनी घरी बसूनच करावे. शक्यतो घरातून बाहेर निघू नये. साधेपणाने नव्या वर्षाचे स्वागत करावे.
- 31 डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर, अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
- विशेषतः मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्येदेखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
- कोरोना च्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व 10 वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
- नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये, तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
- नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे.
- नियमांचे उलंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोरपणे कारवाई करतील.
- नाईट कर्फ्यू रात्री 11वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरूच राहील.
- आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
- फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
- कोविड-१९ या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.