मुंबई : कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष महिनाभर लांबणीवर पडले असले तरी, जुलै महिन्यात शाळा-महाविद्यालयाची दारे उघडण्याचा मुहूर्त निश्चित झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, तसेच ग्रामीण भागातील शाळा उघडण्यास हिरवा कंदिल दर्शवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षणाचाही ‘पुनश्च हरिओम’ केला आहे.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा तसेच उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी या निर्णयास मान्यता दिली. मनातील भीती कमी करण्यासाठी गटागटाने पालक सभांचे आयोजन करावे, असे निर्देशही दिले आहेत. एक दिवसाआड अथवा सम-विषम तारखेनुसार शाळा उघडण्याबाबतही विचार केला जात आहे.कोकणातील शाळांची दुरुस्तीकोकणातील वादळग्रस्त शाळांची प्राधान्याने दुरुस्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.या भागातील शाळांच्या दुरुस्तीसाठी २८ कोटींचा प्रस्ताव शिक्षण विभागाने दिला आहे. शिक्षकांची कोरोना ड्युटी रद्द करावी, शाळा निर्जंतुकीकरणाचा खर्च १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करावा, शिक्षकांना परजिल्हा प्रवासाची मुभा मिळावी,सादिल अनुदान व वेतनेतर अनुदान मिळावे अशा मागण्याही शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.रुग्ण नसलेल्या गावांतच...ज्या गावात अथवा भागात शाळा उघडण्यात येणार आहे, तेथे महिनाभरात कोरोनाचा एकही रुग्ण आढलेला नाही, याची खात्री करून घ्यावी लागेल. शाळा सुरू करण्यापूर्वी व्यवस्थापन समितीची सभा घ्यावी लागेल. शाळांमधील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असेल.प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल वर्गज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाहीत, तिथे प्रायोगिक तत्वावर डिजिटल क्लासरुम सुरू करण्यात येणार आहेत. तसेच दूरदर्शन आणि आकाशवाणी या माध्यमांचाही उपयोग करून घेण्यात येणार आहे.मात्र, पहिली व दुसरीच्या मुलांसाठी ऑनलाईनचा पर्याय नसेल, तर ३ री ते ५ वीच्या मुलांना दररोज १ तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.शाळा सुरू करण्याचे वेळापत्रकवर्ग ९, १० व १२ वी । जुलैपासूनवर्ग ६ वी ते ८ वी । आॅगस्टपासूनवर्ग ३ ते ५ वी । सप्टेंबरपासूनवर्ग १ ते २ री। शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनेइयत्ता ११ वी। दहावीच्या निकालानंतर
CoronaVirus News: राज्यात शाळांची घंटा वाजणार; १ जुलैपासून नवे शैक्षणिक वर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 5:59 AM