अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्यात १२ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हा मुंबई, पुणे आणि नागपूर येथे तीन तपासणी प्रयोगशाळा (लॅब) होत्या. आता त्या १०८ झाल्या आहेत. आत्तापर्यंत ९ लाख ४३ हजार ४८५ चाचण्या झाल्या असून महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक तपासण्या करणारे राज्य ठरले आहे.
कोरोना चाचणी केलेल्या १ लाख ७३ हजार २२७ म्हणजे १८.३० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. देशात खासगी व सरकारी मिळून १०४७ लॅब आहेत. महाराष्ट्रात सरकारी ६२ आणि खासगी ४६ अशा १०८ लॅब कार्यरत आहेत. यापैकी थेट कोरोनाच्या डिटेल तपासणीच्या ७७, ‘ट्रू नेट’ तपासणी करणाऱ्या १६ आणि ‘सीबी नेट’ तपासणीच्या १५ लॅब आहेत. तपासणीपैकी ७,७३,२९१ (८१.७० टक्के) रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.
बिना पेट्रोलची गाडी, म्हणून निधी दिला नाही!भाजप सरकारच्या काळात आरोग्य विभागाला पुरेसा निधी का दिला नाही, असे विचारले असता माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बिना पेट्रोलची गाडी चालते आहे असे आम्हाला वाटत होते, म्हणून निधी दिला गेला नाही, पण आता निधी द्यावाच लागेल.तरीही रुग्णसंख्या अधिक का?
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आपण तपासण्या जास्त करत आहोत म्हणून रुग्णांची संख्या जास्त आहे. आपण एक रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कातील १० जणांची तपासणी करतो. त्यामुळेही संख्या जास्त आहे. मात्र बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे.महाराष्ट्रात सर्वात तपासण्या होत आहेत, ही चांगली बाब आहे. परंतु मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक का आहे, याचे उत्तर सरकारने द्यावे.- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेसर्व सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना लॅब कार्यरत आहेत. त्यासाठीची कोणतीही फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वैद्यकीय मंत्र्यांनी १० मिनिटांच्यावर स्वत:कडे ठेवली नाही. आयसीएमआरनेही गतीने परवानग्या दिल्या. - डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग