मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे. राज्यात शनिवारी ६३ हजार २८२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर दिवसभरात ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात २४ तासांत ६१ हजार ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ३९ लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४.२४ टक्के एवढे झालं आहे.
राज्यात २४ तासांत ८०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ६ लाख ६३ हजार ७५८ इतकी आहे.
राज्यात आज मुंबईत ३८९७, ठाणे १९८३, नाशिक ५४१४, अहमदनगर ४००६, पुणे ८००७ इतके कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण ८०२ मृत्यूंपैकी ४३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १८६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १८६ मृत्यू, पुणे-३८, औरंगाबाद-२७, नाशिक-२४, भंडारा-१९, नागपूर-१८, ठाणे-१७, चंद्रपूर-११, रायगड-६, सोलापूर-४, नांदेड-३, यवतमाळ-३, हिंगोली-२, जळगाव-२, जालना-२, नंदूरबार-२, परभणी-२, बीड-१, कोल्हापूर-१, उस्मानाबाद-१, पालघर-१, सातारा-१ आणि वर्धा-१ असे आहेत.
राज्यात १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी १२ कोटी डोस गरजेचे
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची जबाबदारी केंद्राने राज्यावर दिली आहे. ती पेलण्यासाठी राज्य सरकार समर्थ आहे. सर्व वयोगटातील नागरिकांना लस देण्याची तयारी आहे. १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ६ कोटी नागरिकांसाठी १२ कोटी लसींच्या डोसची गरज आहे. ते एकरकमी चेकने खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. केंद्राने यामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त लसीचा पुरवठा करून दिला तर लसीकरणाच्या माध्यमातून कोविडला मात केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
सहा वाजेपर्यंत ११ हजार लाभार्थ्यांना लस
राज्यात आज १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज २६ जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. आजपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला २६ जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या दि. २ मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे ३ लाख डोसेस खरेदी केले आहेत.