लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चा परिणाम तरुणांवर अधिक होत असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या तीन महिन्यांत मुंबई-ठाण्यात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४५ वयोगटापर्यंतच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे साधारणत: ५ ते ८ टक्के इतके असल्याचे राज्य मृत्यू परीक्षण समितीच्या अभ्यासात समोर आले आहे.
राज्य मृत्यू परीक्षण समितीच्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत झालेल्या मृत्यूंच्या विश्लेषणानुसार, मुंबईतील ४६० तर ठाण्यातील ३४० अशा एकूण ८०० मृत्यूंचा अभ्यास यात करण्यात आला. त्यात ४५ वयोगटापर्यंतच्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण हे ५ ते ८ टक्के असल्याचे समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. यापूर्वी मागील वर्षातील कोरोना संक्रमणादरम्यान हे प्रमाण तीन टक्क्यांच्या आत होते.
राज्यातील ‘डबल म्युटंट स्ट्रेन’मुळे हा बदल झाला आहे. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये झालेल्या मृत्यूंमध्ये ५० वयोगटातील व्यक्तींचे मृत्यू अधिक होते. यावेळी मात्र ४५ वयोगटातील व्यक्तींचे मृत्यू वाढले आहेत, असे डॉ. सुपे यांनी सांगितले. तरीही घाबरण्यासारखी परिस्थिती नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. नव्या स्ट्रेनमध्ये सुरुवातीचे पाच ते सात दिवस काही लक्षणे दिसत नाहीत. तो शरीरात आतल्या आत पसरतो. त्यानंतर तो अचानक आक्रमकपणे वाढत असल्याचेही डॉ. सुपे यांनी सांगितले.
४७.५ टक्के रुग्णांना श्वसनाचा त्रासइंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल झालेल्या ४७.५ टक्के रुग्णांना श्वसनाचा त्रास झाल्याचे निदर्शनास आले आहे. पहिल्या लाटेत हे प्रमाण ४१.७ टक्के इतके होते. यामुळे दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढल्याचेही सातत्याने दिसून येतेे.तरुणांमध्ये श्वसनाचा त्रास वाढलाnसेंटर इंटिग्रेटेड डिसिज सर्व्हायलन्स प्रोगामच्या माहितीनुसार, मागील वर्षी ३१ टक्के तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, तर यंदाच्या लाटेत हे प्रमाण ३२ टक्क्यांवर आले आहे. नवजात बालक ते ३९ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचे पहिल्या लाटेच्या तुलनेतील बाधित होण्याचे प्रमाण काहीसे वाढले आहे. नवजात बालक ते १९ वर्षांपर्यंतचे ५.८ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. पहिल्या लाटेत हे प्रमाण ४.२ टक्के इतके होते, तर २० ते ३९ वयोगटातील २५.५ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत, पहिल्या लाटेत हे प्रमाण २३.७ टक्के होते. nकोरोनाच्या दोन्ही लाटेत ज्येष्ठ नागरिकांचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे, तर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमधील ७० टक्के प्रमाण हे ४० हून अधिक वयोगटातील व्यक्तींचे आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लक्षणविरहित असणारे मात्र श्वसनाचा त्रास असलेले अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.