जालना : दारूच्या दुकानांसह हॉटेल, रेस्टॉरंट व इतर आस्थापनांमध्ये गर्दी झाली तर त्यावर बंदी आणली जाईल, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लागू केले आहेत. भविष्यात रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनची मागणी वाढली तर यापेक्षाही अधिक कडक निर्बंध लागू करावे लागतील, असे टोपे यांनी येथे स्पष्ट केले.
राज्यभरात रविवारी रात्रीपासून संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल चालक, रेस्टॉरंट यांना ५० टक्के क्षमतेने सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी सर्व समाजाचे हित पाहून निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन टोपे यांनी केले.
मंदिरांसह इतर सर्वच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. सध्या लागू असलेले निर्बंध सर्वांनी पाळले तर कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. परंतु दारूच्या दुकानांसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमध्ये सूचनांचे उल्लंघन करीत गर्दी होत असेल तर तीही बंद करावी लागतील, असेही टोपे म्हणाले.