मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र याच दरम्यान सातत्याने चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे. देशात कोरोनाच्या आकडेवारीने नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. एकूण रुग्णांच्या संख्येने तब्बल 33 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही सात लाखांवर गेली असून आतापर्यंत 23,775 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी (28 ऑगस्ट) कोरोनाचे 14,361 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 331जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 7,47,995 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 23 हजारांवर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल पाच लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 5,43,170 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशातील रुग्णसंख्येने 33 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात तब्बल 60 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत. तसेच लसीसंदर्भात ही चाचण्या केल्या जात आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून भारतात कोरोना लस 2021 च्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे. सीरम इन्स्टिट्यूट देशात आपली लस वितरीत करण्याच्या पूर्ण तयारीत असणार आहे. वॉल स्ट्रीट रिसर्च आणि ब्रोकरेज फर्म, बर्नस्टीन रिसर्च यांच्या रिपोर्टमधून हा खुलासा करण्यात आला आहे.
बर्नस्टीनच्या रिपोर्टनुसार, जागतिक पातळीवर सध्या चार लसींना 2020 या वर्षाखेरीस आणि 2021 च्या सुरुवातीच्या तीन महिन्यापर्यंत मंजुरी मिळू शकते. सध्या भागिदारीच्या माध्यमातून भारताकडे दोन लस आहेत. यामध्ये ऑक्सफर्डची वायरल वेक्टर वॅक्सीन आणि नोवावॅक्सची प्रोटीन सब युनिट वॅक्सीनचा पर्याय आहे. दोन्ही लसींच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची डेटा सुरक्षितेच्याबाबतीत आणि रोग प्रतिरोधक क्षमतेबाबत आशादायक माहिती मिळत आहे. भारताच्या जागतिक क्षमतेबाबतही यामध्ये सकारात्मकपणे नमूद करण्यात आले आहे. भारताला लस उत्पादन करण्याबाबतच्या आव्हानांचा सामना करावा लागणार नसल्याची आशा रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सुशांतला मानाचा पुरस्कार; दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान
'निवडणुकीत माझा पराभव झाल्यास अमेरिकेवर चीनचा ताबा', ट्रम्प यांचं मोठं विधान
CoronaVirus News : भारताकडे कधी असणार कोरोना लस आणि किंमत किती?, रिसर्चमधून आली आनंदाची बातमी
"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप
देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य