पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे दारूच्या दुकानांबाहेर सोमवारी आणि मंगळवारी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावत मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले आहे.
या दुकानाबाहेर जमलेल्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टंसिन्गचा पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण राज्यात दारु विक्री घातक आहे. त्यामुळे महसूल सोडा आणि सामाजिक अंगाने विचार करा, असा सल्ला राज्य सरकारला देत लॉकडाऊनच्या काळात होणाऱ्या मद्यविक्रीला एकप्रकारे विरोध दर्शविला आहे.
"सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात दारु विक्री घातक ठरणार आहे. पुणे, मुंबईतील दारु विक्रीची दुकाने बंद करायला हवीत. कारण, सोशल डिस्टन्सिंगचा बोऱ्या वाजत आहे. दारु ही जीवनावश्यक वस्तू नाही. त्यामुळे महसूल हा विषय बाजूला ठेवा आणि सामाजिक अंगाने विचार करा", असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
दारू विक्रीतून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरू असल्याने राज्याची अर्थव्यवस्थेवर संकट ओढवले आहे. तसेच, राज्य सरकारला मिळणाऱ्या महसूलात घट झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करत दारूची दुकाने उघडण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे.
दरम्यान, दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर पुणे तसेच पिंपरी शहरातील दारूच्या दुकानांबाहेर सोमवारी आणि मंगळवारी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावत मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे दारू विक्रीसाठी परवानगी देताना दिलेल्या अटींचे पालन न केल्याने व हडपसरमधील ७ वाईन शॉप मालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.