मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत अचानक वाढ झाली आहे. गरोदर कोरोनाग्रस्त महिलांचे नवजात बालक कोरोनामुक्त, ही आनंददायी बाब आहे. मात्र, या पुढची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदात्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याचे परिस्थीती पाहून ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यावरील पुढील संकटाची चाहूलही त्यांनी दिली. राज्यात जे बेड्स उपलब्ध करतोय, त्याठिकाणी जास्तीत जास्त ऑक्सिजनची सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, राज्यात पुन्हा एकदा रक्तदानाची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच पुढील ८ ते १० दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याला येत्या काळात रक्ताची मोठी गरज लागणार आहे. यासाठी रक्तदान करणाऱ्यांनी मदतीसाठी पुढे यावं, असे आवाहन त्यांनी केले. उन्हाळी साथीपासून दूर राहिलो तसेच पावसाळी रोगापासून दूर राहण्याचा मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला. तसेच कोरोना विषाणूवर औषध नाही खरं असलं तरी रुग्णांना बरे करण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न आहे. ताप अंगावर काढू नका, थकवा जाणवतोय तर तात्काळ डॉक्टरांकडे जा, असे आवाहनही त्यांनी केले. शेवटच्या टप्प्यात आल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर येत असल्याचेही ते म्हणाले.
पुढचे दिवस धोक्याचे....कोरोना रुग्ण आणखी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढणार असून गुणाकाराने कोरोना पसरणार आहे. लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा, ज्या पद्धतीने हळूहळू लॉकडाऊन घालण्यात आला तसचं हळूहळू लॉकडाऊन उठवण्यात येईल. कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे, सोशल डिस्टेंसिंग पाळा, तोंडाला मास्क लावा, रस्त्यावर थुंकू नका, हात वारंवार स्वच्छ ठेवा हे करावं लागेल. कोरोनाकडे सकारात्मकदृष्टीने पाहा, आपण जगायचं कसं हे कोरोनामुळे शिकलो आहे. लॉकडाऊन एकदम उठवता येणार नाही, आयुष्याची गाडी हळूहळू रुळावर आणायची आहे. लॉकडाऊन शब्द न वापरता आम्ही काय काय सुरु करणार याची यादी देऊ, या गोष्टी सुरळीत राहण्याची जबाबदारी सरकारपेक्षा लोकांची जास्त आहे. पुढील काही दिवस धार्मिक, सामाजिक, सण-उत्सव घरातच साजरे करा, प्रत्येक धर्मातील लोकांनी आपापल्या ईश्वराकडे प्रार्थना करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Lockdown 4 : दीड महिन्याने यथेच्छ दारुचे प्राशन; घरी येताच मृत्यू
खतरनाक Video! अमेरिकेच्या नौदलाकडे नवे संहारक शस्त्र; दारुगोळ्याशिवाय विमान केले नष्ट
चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र
कर्मचाऱ्यांनो! पुढची १० वर्षे घरूनच काम करा, काही हरकत नाही; मार्क झकरबर्गची घोषणा