मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र याच दरम्यान सातत्याने चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे. देशात कोरोनाच्या आकडेवारीने नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. एकूण रुग्णांच्या संख्येने तब्बल 17 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही चार लाखांवर गेली असून आतापर्यंत 15,576 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी (2 ऑगस्ट) कोरोनाचे 9,509 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 260 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4,41,228 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 15 हजारांवर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल दोन लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 2,76,809 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही 1,48,537 वर पोहोचली आहे. यातील 44,204 रुग्ण हे पुण्यामधील असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 54,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 853 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 17 लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 37,364 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (2 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 54,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 17,50,724 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 37 हजारांवर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण
CoronaVirus News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह
टिक टाॅकची 'टिकटिक' किती देशांत?; जाणून घ्या चायनीज अॅपबद्दल बरंच काही...
Video - ...म्हणून गर्भवतीला टोपलीत बसवून नदी पार करत पोहचवलं रुग्णालयात
"राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं कोणतंही योगदान नाही तर..." भाजपा खासदाराचा घरचा आहेर
धक्कादायक! पंजाबमध्ये विषारी दारूने घेतला 86 जणांचा बळी; 25 जणांना अटक