मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,10,16,434 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,584 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,56,463 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान सातत्याने चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 21 लाखांवर गेली असून आतापर्यंत 51 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात मंगळवारी (23 फेब्रुवारी) कोरोनाचे 6218 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 21,12,312 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 51,857 वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल 20 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 20,05,851 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
चिंताजनक! लस घेतली म्हणून रिलॅक्स राहणं पडू शकतं महागात; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. कारण जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर लोक बिनधास्तपणे वापरत आहेत. लस घेतली म्हणजे आपण कोरोनापासून बचावलो असं अजिबात नाही. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे.
ह्युमन बिहेविअर नियतकालिकेत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, दाट वस्ती आणि जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका टळणार नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. चायनीय युनिव्हर्सिटी ऑफ हॉंगकॉंगच्या सहकार्याने साऊथॅम्प्टन विद्यापीठाने याबाबत अभ्यास केला आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी चीनमध्ये लसीकरण (Vaccination) आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) याचा एकत्रित अभ्यास करण्यात आला. या संशोधनातून कमी, मध्यम व उच्च लोकसंख्येच्या शहरांवर कोरोनाच्या होणाऱ्या परिणामाबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.