मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहेत. रुग्णांच्या संख्येने 74 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे राज्यातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आज 9060 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज 11204 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1369810 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 182973 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.86% झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी (18 ऑक्टोबर) कोरोनाचे 9,060 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 150 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 15,95,381 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 42 हजारांवर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल 13 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 1369810 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
'देशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग झालाय, पण…', केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच केलं मान्य
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Harsh Vardhan) यांनी भारतात कोरोना समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला असल्याचं रविवारी मान्य केलं आहे. मात्र हा समूह संसर्ग केवळ काही जिल्हे आणि राज्यांपुरता मर्यादित असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या विधानानंतर त्यांनी ही माहिती दिली. याआधी ममता बॅनर्जी यांनीराज्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्याचं म्हटलं होतं.
हर्षवर्धन यांनी "संडे संवाद" या त्यांच्या सोशल मीडियातील कार्यक्रमात याबाबत माहिती दिली आहे. इतर राज्यांमध्ये देखील समूह संसर्ग सुरू आहे का? असा प्रश्न हर्षवर्धन यांना केला गेला. "पश्चिम बंगालसह विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या भागात समूह संसर्ग प्रसार होण्याची शक्यता आहे. खास करून दाट लोकवस्तीत हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. पण समूह संसर्ग हा संपूर्ण देशभरात नाही आहे. हा फक्त मर्यादित राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्येच आहे" अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे.