लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत असतानाच रत्नागिरीला शनिवारी सायंकाळी तब्बल १३ कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने आणखी एक मोठा धक्का बसला. मंडणगड तालुक्यात एकाचवेळी कोरोनाचे ११ पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. तर खेडमध्ये २ नवे रुग्ण सापडले आहेत. एकाचवेळी १३ कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हा हादरून गेला आहे. यामध्ये ९ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३४ झाली आहे.
मुंबईतून जिल्ह्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांचे अहवाल सातत्याने पॉझिटीव्ह येत आहेत. मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यातच शनिवारी सायंकाळी मंडणगड तालुक्यात तब्बल ११ पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. हे सर्वजण मुंबईतून आल्यानंतर क्वॉरंटाईन करण्यात आले होते.
तालुक्यातील ३५ जणांचे स्वॅबचे नमुने ७ मे रोजी तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले होते. त्यातील १५ अहवाल ८ मे रोजी जिल्हा शासकीय रूग्णालयाला प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. उर्वरीत २० जणांचे अहवाल शनिवारी सायंकाळी प्राप्त झाले. त्यातील ११ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ६ अहवाल निगेटिव्ह आले असून, ३ अहवालांमध्ये तांत्रिक दोष आहे. मंडणगड तालुक्यात शनिवारी आढळलेले कोरोनाबाधित रूग्ण मुंबईतून आलेले आहेत. त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले होते. मंडणगड पाठोपाठ खेड तालुक्यातील कळंबणी अंतर्गत दोघांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना लवेल येथे क्वॉरंटाईन करण्यात आले होते. या दोघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.
जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या १३ कोरोनाबाधित रूग्णांमुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४ झाली आहे. त्यापैकी ५ रुग्ण बरे झाले होते तर एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर २८ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus खूशखबर! देशातील आणखी एक राज्य झाले कोरोनामुक्त
CoronaVirus ...पण अर्थव्यवस्थाही पहावी लागेल; नितीन गडकरींचे लॉकडाऊनवर संकेत
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २०००० पार; दिवसभरात ४८ मृत्यू
CoronaVirus in Mumbai चिंताजनक! मुंबईत मृतांच्या आकड्यात वाढ; ७२२ नवे रुग्ण
लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार