मुंबई: देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५६ हजारांच्या पुढे गेली असून त्यात महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. एकट्या मुंबईत कोरोनाचे ११ हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल रोष व्यक्त होत आहे. ट्विटरवर #UddhavMustAnswer हॅशटॅग ट्रेंडमध्ये असून अनेकजण या हॅशटॅगचा वापर करुन मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आहेत.सायन रुग्णालयातल्या वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या शेजारी मृतदेह ठेवण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर भाष्य करताना यावरुन राजकारण करण्याची गरज नाही. रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या शरीरातून विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी तो काळ्या रंगाच्या मोठ्या पिशवीमध्ये ठेवला जातो, असं उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं. यानंतर भाजपा महाराष्ट्रनं एक ट्विट केलं. आरोग्यमंत्र्यांच्या असंवेदनशील प्रतिक्रियेशी सहमत आहात का, असा प्रश्न भाजपानं ट्विटमधून विचारला. या ट्विटमध्ये #UddhavMustAnswer वापरण्यात आला.
ट्विटरवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सुरू असलेल्या टीकेला काँग्रेस नेते चरणसिंग सप्रांनी उत्तर दिलं आहे. राज्य सरकारनं केलेल्या कामांची माहिती सप्रा यांनी आकडेवारीसह दिली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारनं उचलेली पावलं, घेतलेले महत्त्वाचे निर्णय यांचा तपशील सप्रा यांनी दिला आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे. मात्र केंद्र सरकार जीएसटीमधील महाराष्ट्राचा वाटा अजूनही देत नाही. राज्याचे १५ हजार कोटी मोदी सरकारनं थकवले आहेत. २५ हजार कोटींच्या पॅकेजची गरज असताना केवळ १६०० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असं सप्रांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.