ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात एका अनोख्या पद्धतीने दोन वर्षांच्या चिमुकलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मनसेचे कोपरी पाचपाखाडीचे नेते आणि स्वामी फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश कदम यांच्या मुलीचा आज वाढदिवस होता. मात्र महेश कदम यांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना सॅनेटायझर आणि मास्क वाटप करुन सामाजिक संदेश दिला आहे.
महेश कदम यांची कन्या स्वीमीनी कदमचा आज वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या खर्चातून त्यांनी हे मास्क आणि सॅनेटायझर देण्याचे ठरविले. महेश कदम यांच्या या निर्णयामुळे वाढदिवसादिनी त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. महेश कदम यांनी बालरोगतज्ञ डॉ. सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते मुलांना मास्क आणि सॅनेटायझर वाटप केले.
लहान मुलांची रोग प्रतिकारक क्षमता कमी असते त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे असं मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तसेच मुलांना सुट्ट्या मिळाल्या असल्या तरी आमच्या चंदनवाडी परिसरात मी पाहिले की मुले कुठेही खेळत आहेत, कसेही फिरतात, त्यांना या रोगाचे दुष्परिणाम माहीत नाही. त्यामुळे आम्ही मास्क आणि सॅनेटायझरचे वाटप केले असल्याचे महेश कदम यांनी सांगितले.