मुंबई – कोरोना व्हायरसची वाढणारी संख्या देशासाठी अन् विशेषत: राज्यासाठी चिंतेचा विषय बनली असताना काही घृणास्पद प्रकार समोर येत आहेत. मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचं कशाला? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.
राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, कर मिळणार नाही, उद्योग बंद राहतील, मंदी येईल, हे सगळं तुमच्या एका चुकीने होईल. वसईत मरकज कार्यक्रमाला परवानगी नाकारली, त्याबद्दल पोलिसांचं अभिमंदन करतो. या दिवसामध्ये जर कोणी काळाबाजार करत असेल त्यांना फोडून काढला पाहिजे, तुम्हाला कुटुंब आहेत की नाही? तुमच्याही अंगलट येईल असं त्यांनी सांगितले.
तसेच पंतप्रधान म्हणाले दिवे पेटवा, लोक करतीलही, घरी बसून काहीतरी करायचं म्हणून करतील, पण केवळ दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता अशा शब्दात राज ठाकरेंनी मोदींच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली. समाजाची सर्वात मोठी जबाबदारी आहे, नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञही असायला हवं. जर लोक असेच वागणार असतील तर लॉकडाऊन वाढेलच, डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी यांना पेशंट शोधायलाच वेळ जाईल, घरी लोक लपून बसलेत, लक्षणे आढळलेल्यांनी स्वत: पुढे आले पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं.
त्याचसोबत भाज्यांवर थुंकणारे, नर्ससमोर नग्न होणारे यासारख्यांना फोडून काढलं पाहिजे, त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले पाहिजेत. नुसता केसेस टाकून उपयोग नाही. कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करण्याऱ्यांना गोळ्या घाला. लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, आक्षेपार्ह वागणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे असा इशारा राज यांनी दिला.
दरम्यान, लोकांमधील संभ्रम सरकराने दूर करावा. सर्व डॉक्टर स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत, पोलीस, शेतकरी, पाणीपुरवठा कर्मचारी आणि सरकार काम करत आहे, मात्र लोकांना गांभीर्य कळत नाहीय. लोकांना भीती आहे नोकरी राहील का, भाजीपाला मिळेल का, रेशन मिळेल का वगैरे, पण काहीजण शिस्त पाळत नाहीत, त्यामुळे ही वेळ आलीय. लॉकडाऊन गांभीर्याने, रेशन, भाजीचे प्रश्न आहेत, ते अनेक ठिकाणी उपलब्ध आहे, सरकार उपलब्ध करतंय, हे गांभीर्याने घेतलं नाही आणि दिवस वाढवले तर त्याचे परिणाम उद्योगधंद्यासह सर्वांवर होईल अशीही भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली.