- अजय परचुरेमुंबई : कोरोना व्हायरसचा वाढत धोका पाहता येत्या गुरुवारपासून ३१ मार्चपर्यंत सिनेमा, छोटा पडदा, वेबसिरीज आणि जाहिराती या सर्वमनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकांचे संपूर्ण चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी मुंबईत फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान निर्मात्याला होणार आहे. तसेच या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या अनेक कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे .कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली होती. येत्या काही आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत . ह्याच पार्श्वभूमीवर सिनेक्षेत्राशी संबंधित असणाºया सर्व संघटनांनी एकत्र येऊन खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. सिनेमांचे तसेच मालिकांचे दिवस रात्र सुरू असणारे चित्रीकरण ज्या ठिकाणी होते तिथे अनेक लोक एकत्र येऊन काम करत असतात. गर्दीमुळे यांनाही कोरोनाची संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे यावर नियंत्रण राहावे म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे, असे निर्माते अशोक पंडित यांनी सांगितले.दोन दिवसांत आटपून घ्या...याचा परिणाम मराठी सिनेमा आणि डेलीसोप यांच्या चित्रीकरणावरही होणार आहे. ठरलेल्या नियोजनात त्यांना मोठे बदल करावे लागणार आहेत. येत्या दोन दिवसांत आधी ठरवल्याप्रमाणे राहिलेले चित्रीकरण पूर्ण करून गुरुवारपासून ३१ मार्चपर्यंत संपूर्ण चित्रीकरणाला ब्रेक देण्यात येणार आहे. गुरुवारपासून गोरेगाव चित्रनगरी, मढ, ठाणे, मिरा रोड या भागातील स्टुडिओ, बंगले येथे कोणतेही चित्रीकरण होणार नाही.
Coronavirus : सिनेमा, मालिकांचे चित्रीकरण ३१ मार्चपर्यंत रद्द, निर्मात्यांचे कोट्यवधींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 5:59 AM