मुंबई - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचं हे संकट असतानाच आता राज्यासमोर अजून एक संकट उभं राहिलं आहे. मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल एवढाचा रक्ताचा साठा (Blood) शिल्लक असल्याची आता माहिती मिळत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी दिली आहे. यासोबतच त्यांनी नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहनही देखील केलं आहे.
राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईसह राज्यातील रक्तसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर याबाबत माहिती दिली आहे. "मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल एवढा तर जास्तीत जास्त दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महत्त्वाच्या शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना रक्ताची अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावं. रुग्णालये आणि विविध सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेत रक्तदान शिबिरे आयोजित करावीत" असं आवाहन शिंगणे यांनी केलं आहे.
राज्यात कठोर निर्बंध लागणार; आगामी एक-दोन दिवसांत घोषणा करणार, राजेश टोपेंची माहिती
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला लॉकडाऊनच्या उपाययोजना करण्याचे दिलेले आदेश, भारतीय जनता पक्ष यांचा लॉकडाऊनला असलेला विरोध या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. टीव्ही 9 मराठी या वृ्त्तवाहिनीशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं स्पष्ट केलं आहे. सध्या 2एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चा राजेश टोपे यांनी फेटाळून लावल्या आहेत. लॉकडाऊनसंदर्भात तुर्तास तरी चर्चा सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
लॉकडाऊन करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र याबाबत सरकारची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते. राज्यात 50 टक्के लॉकडाऊन लागणार, हे वृत्त राजेश टोपे यांनी फेटाळून लावले. पण सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्बंधाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असा इशारा देखील राजेश टोपे यांनी दिला आहे.