मुंबई : शिवसेना खा. संजय राऊत यांनी राज्यपालांविषयी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. ज्यांच्या मनात काही काळंबेरं नाही, त्यांनी वाईट वाटून घ्यायचे काही कारण नाही. राज्य मोठ्या संकटात असताना काहींना फक्त राजकारण सूचत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.मंत्रिमंडळाने केलेली शिफारस राज्यपालांनी अद्याप स्वीकारलेली नाही, भाजप त्यावर राजकारण करत आहे का? असे विचारले असता पाटील म्हणाले, राज्य शासनाची शिफारस राज्यपालांना मान्य करावीच लागते. फार तर ते त्यात काही बदल किंवा सूचना करू शकतात. त्या जर त्यांनी केल्या तर त्यानुसार बदल करण्याचे काम राज्य शासन करेल. पण अद्याप त्यांनी यावर काही मत व्यक्त केलेले नाही, त्यांचा अभ्यास झाला की, ते मत कळवतील. मात्र काही तरी तांत्रिक कारणे देऊन भाजप राजकारण करू पहात आहे. त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी न्यायालयात जात आहेत, यातून त्यांची भूमिका स्पष्ट होते, त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज उरत नाही. हे राज्यासाठी दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत प्रामाणिकपणे सगळ्या मंत्र्यांना सोबत घेऊन कोरोनाशी लढा देत आहेत. कोरोनाची साथ असताना भाजपने मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी धडपड केली. आता महाराष्ट्र बिकट संकटातून जात असताना त्यांना राजकारण सूचत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
CoronaVirus: राज्य संकटात असताना काहींना राजकारण सुचतंय - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 4:04 AM