मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील २१ दिवस देशभरात लॉकडाऊन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री ८ वाजता केली. केली. नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्यभरात सर्वत्र नागरिकांनी घरातील अत्यावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी दुकानांबाहेर गर्दी केली होती. त्यामुळे लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी आहे का असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.
मंत्री आणि राषट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील ट्विट करत म्हणाले की, जगातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. तसेच लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे, असं जयंत पाटील यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन सकाळी जाहीर करुन जनतेला तयारी करण्यासाठी वेळ द्यायला हवा होता असं जयंत पाटील यांनी सांगतिले.
जीवनावश्यक गोष्टींबाबत पंतप्रधानांच्या निवेदनात स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने, देशात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, असं जयंत पाटील यांना सांगितले. महाराष्ट्रात गेले दोन दिवस लॉकडाऊन सुरूच आहे. पुढील काळातही जनतेच्या सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. हे सरकार जनतेला जीवनावश्यक सुविधांच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासनही जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेला दिले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील २१ दिवस देशभरात लॉकडाऊन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा नरेंद्र मोदींनी केली. स्वत:ला वाचवण्यासाठी, कुटुंबीयांना वाचवण्यासाठी आणि देशाला वाचवण्यासाठी पुढील २१ दिवस घरात राहा. बाहेर पडू नका, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं. परिस्थिती अतिशय आव्हानात्मक आहे. या परिस्थितीत संपूर्ण देश एक म्हणून उभा आहे. २१ दिवसांचा कालावधी मोठा आहे. मात्र आपण निश्चितपणे कोरोनावर विजय मिळवू, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मोदींच्या लॉकडाऊन आवाहनानंतर नागरिकांमध्ये गंभीर वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी किराणा आणि अत्यावश्यक सेवांच्या दुकानी खरेदीसाठी गर्दी केली होती. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रात्री पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. माझे नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसेच राहतील. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.