मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता जवळपास १०० पर्यंत पोहचली आहे. तर कोरोनामुळं ६५ वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे. देशभरातील जवळपास सर्वच राज्यात लॉक डाऊन करण्यात आलंय. तरीही, लोकं घरातून बाहेर पडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच स्तरांतून लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात येतंय. वेगवेगळ्या संकल्पना लढवून नागरिकांना घरी बसण्याचं सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियात इटली, जर्मनी, अमेरिका आणि विदेशातील भारतीयांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तेथील परिस्थिती सांगत कोरोनाबद्दल घ्यावयाच काळजी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली जात आहे. तसेच, वेगवेगळ्या हटके संकल्पना लढवून पोलिसांना सहकार्य करा, घरातच बसा, असे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राकडून एक फोटो ट्विट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये झाडाच्या बुंध्यातील आपल्या घरात बसलेला पोपट दिसून येतो. या पोपटाप्रमाणे वागायची वेळ आता आली असल्याचं सांगत नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन महाराष्ट्र परिचय केंद्राने केले आहे. जवा नवीन पोपट हा लागला, घरी बसा असं सांगायला... अशा टॅगलाईनने हा फोटो ट्विटरवरुन शेअर करण्यात आला आहे.
कोरोनासंदर्भात अद्यापही नागरिकांमध्ये गांभीर्य दिसत नसून लोक घराबाहेर पडत आहेत. विनाकारण रस्त्यावर आणि भाजी मार्केटमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनाची जनजागृती गरजेची आहे. दरम्यान, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते. नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे राज्यात 31 मार्चपर्यत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केला. तर, देशभरातील ३० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्येही लॉक डाऊन आहे. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे.