मुंबई/नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन खतरनाक म्युटंट ‘ओमीक्रॉन’च्या धास्तीने राज्य सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोनासंदर्भातील नवीन नियमावली शनिवारी जारी करीत निर्बंध कडक केले. कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांनाच रिक्षा, टॅक्सी, बस, कॅब अशा सर्व सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळा कोरोनाच्या आधीप्रमाणे करण्याची मुभा स्थानिक प्राधिकरणांना असेल. परंतु पूर्णत: लसीकरण केलेल्यांनाच नियमांचे पालन करून अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल.
तिकीट असलेल्या किंवा नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा देणारे व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते इत्यादी) अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांनी संपूर्ण लसीकरण केलेले असणेदेखील अनिर्वाय असेल. कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे.
राज्य शासनाने तयार केलेला ‘युनिव्हर्सल पास’ हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले ‘कोविन प्रमाणपत्रदेखील’ त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्यांना लस घेता आली नाही अशा व्यक्तींसाठी, डॉक्टरांचे प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थानावरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे लागू राहतील. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेली आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीसाठी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाइन करण्यात येणार आहे. तसेच त्यांची चाचणी करून ते नमुने ‘जेनोम सिक्वेन्सिंग’साठी पाठविण्यात येणार असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन आणि विद्युत ऑडिट करण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्या. सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करून त्या कार्यरत करण्यासाठी सज्ज करून ठेवण्याचे निर्देशही नगरविकास मंत्र्यांनी दिले. आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले.ओमीक्रॉन सापडलेल्या १० देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व महानगरपालिकांकडून सहायक आयुक्तांच्या माध्यमातून दिली जाईल. अति जोखमीच्या देशांतून गेल्या १४ दिवसांतून आलेल्या प्रवाशांची यादीदेखील विमानतळाकडून घेण्यासही शिंदे यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्णब्रिटनमध्ये ओमिक्राॅन या नव्या विषाणूची बाधा झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे त्या देशात घबराट पसरली आहे. हे दोन रुग्ण व त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या आणखी दोन व्यक्ती अशा चार जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या आणखी काही चाचण्या करण्यात आल्या. हे दोन कोरोना रुग्ण ब्रिटनच्या चेल्म्सफोर्ड व नॉटिंगहॅम भागातील आहेत.
काय आहेत नवे निर्बंध?- कोणत्याही कार्यक्रमाच्या अथवा समारंभासाठी बंदिस्त जागेच्या क्षमतेपैकी ५० टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.- संपूर्ण संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. - कोणत्याही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी, त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रासाठी यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती वाढविता येतील. परंतु कमी करता येणार नाहीत, मात्र, जाहीर नोटिसीद्वारे ४८ तासांची पूर्व सूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही. - नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रूमालाला मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.) - जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (६ फूट अंतर) राखा. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व हात स्वच्छ धुवा. - साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर - वापरता, नाक/ डोळे/ तोंड यांना स्पर्श करणे टाळा.- खोकताना किंवा शिंकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा. - सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (६ फूट अंतर) राखा कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार अथवा अभिवादन करा, असे नियमावलीत म्हटले आहे.
ओमीक्रॉनची लागण झालेला रुग्ण अद्याप देश, महाराष्ट्रात सापडलेला नाही. परंतु गाफील न राहता सतर्कता बाळगून नियमांचे पालन सक्तीने करावे. आम्ही केंद्राच्या सूचनांकडे लक्ष ठेवून असून आफ्रिका खंडातून येणाऱ्यांना अलगीकरणात ठेवून नंतरच त्यांना घरी साेडावे, अशी आपली आग्रही मागणी आहे.- राजेश टोेपे, आरोग्यमंत्री
५०० ते ५० हजारांपर्यंत दंडकोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये, आस्थापनांना १० ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद नियमावलीत आहे.
बंगळुरूत आलेले दोन कोरोनाबाधित- दक्षिण आफ्रिकेहून बंगळुरू येथे शनिवारी आलेल्यांपैकी दोन प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळले. बंगळुरूतील विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी झाली. त्यांना ओमिक्राॅन या नव्या विषाणूची बाधा झाली आहे का यासाठी आणखी चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांचा अहवाल सोमवारपर्यंत हाती येईल.- बंगळूरू ग्रामीणचे उपजिल्हाधिकारी के. श्रीनिवास यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेच्या या दोन नागरिकांना विलगीकरणात ठेवले आहे. कोरोना तीव्र असलेल्या १० देशांतून बंगळुरू येेथे आलेल्या ५८४ प्रवाशांमध्ये ९४ जण दक्षिण आफ्रिकेचे नागरिक आहेत.