- सदाशिव मोरे, आजरालाकूडवाडी (ता. आजरा) येथील बाबू रानबा गिलबिले या १०३ वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. एका बाजूला गावातील कोरोनाबाधितांचा होणारा मृत्यू आणि दुसऱ्या बाजूला १०३ वर्षांच्या आजोबांनी कोरोनाला हरवून आपले जीवन पुन्हा एकदा सुरू केले आहे. आजऱ्यातील दोन्ही कोविड सेंटरनी आजोबांना दाखल करून घेतले नाही. तर गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांनी मोठ्या हॉस्पिटलला घेवून जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मुलगा व सून यांनी त्यांना शेतात आणले. शेतातील मुबलक ऑक्सिजन व वेळेवर मिळालेला फलाहार व भाजीपाला यामुळे आजोबा ठणठणीत झाले आहेत.बाबू गिलबले यांना १८ मे रोजी श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने आजरा कोविड सेंटरमध्ये आणण्यात आले. त्या ठिकाणी आॅक्सिजन बेड शिल्लक नाही. तीच अवस्था रोझरी सेंटरचीही होती. आजोबांची ऑक्सिजन पातळी ७० इतकी होती. त्यामुळे त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ऑक्सिजन लावल्यानंतर बाबू गिलबिले यांची ऑक्सिजन पातळी ८० पर्यंत गेली. मात्र त्या ठिकाणचे पेशंट पाहून बाबू गिलबिले अस्वस्थ झाले. मुलगा चंद्रकांत यांना घरी घेवून जाण्याची ते सारखी विनंती करू लागले व तोंडाचा ऑक्सिजन काढून टाकू लागले. कॉटला बांधून सर्व त्रास सहन करीत तीन दिवस त्या ठिकाणी बाबू गिलबिले यांना ठेवण्यात आले. त्यांच्यासोबत मुलगा चंद्रकांतही तेथेच राहिले. मात्र नाईलाज झाल्याने मुलगा चंद्रकांत व सून वत्सला यांनी आजोबांना आपल्या शेतात घेवून जाण्याचा निर्णय घेतला. आजोबांना घेवूनच या दोघांनी शेतातच सेवा करण्यास सुरुवात केली.डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या, औषधे, नारळाचे पाणी, चिक्कू व आंब्याचा रस आणि सकाळ, संध्याकाळ अंडी खाऊन आजोबा ठणठणीत झालेत. आता त्यांची अॉक्सिजनची पातळी ९८ इतकी आहे. सध्या ते शेतात सर्वत्र फिरत असून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. त्यांनी कोरोनाला हरविले आहे. लहानपणापासून बाबू गिलबिले हे मल्ल होते. लाठीकाठी, कबड्डी व मलखांबची त्यांना आवड होती. दहा वर्षांपूर्वी ते रायगडावर स्वत: चालत गेले आहेत.उपचारासाठी गेले व मृत झाले...लाकूडवाडी गावातील अनेकजण गडहिंग्लज येथे कोरोनाच्या उपचारासाठी गेले. उपचार सुरू असतानाच ८ जण मृत झाले आहेत. मात्र १०३ वर्षांचे बाबू गिलबिले या आजोबांनी कोरोनावर मात करून आपल्या जीवनाची नवीन इनिंग सुरू केली आहे.
CoronaVirus News: १०३ वर्षांच्या आजोबांनी कोरोनाला हरवले; जीवनाची सुरू केली नवीन इनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 8:53 AM